नागपूर : नामनिर्देशनपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी फेटाळून लावल्यामुळे काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांना लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यात हस्तक्षेप करता येत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्याची बर्वे यांची दुसरी मागणी मात्र मंजूर करण्यात आली. तसेच, राज्य सरकारसह इतर सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून यावर येत्या २४ एप्रिलपर्यंत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रकरणावर न्या. अविनाश घरोटे व न्या. मुकुलिका जवळकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
राज्य सरकार व भारतीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचा पुंनुस्वामी प्रकरणातील निर्णय सादर करून निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही असा दावा केला. उच्च न्यायालयाला तो दावा योग्य आढळून आला. बर्वे यांना ही लोकसभा निवडणूक लढता येणार नाही, पण त्यांना निवडणूक झाल्यानंतर उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून या निवडणुकीला आव्हान देता येईल.