जितेंद्र ढवळे,नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधि विभागात सुसज्ज अशा संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. संशोधन, स्पर्धा परीक्षा तयारी त्याचप्रमाणे न्यायालयीन कामकाज घडामोडीची माहिती मिळविण्यासाठी ई-रिसोर्स मदत करणार आहे, अशी संगणक लॅब प्रत्येक विभागाची गरज असल्याचे मत डॉ. चौधरी यांनी उद्घाटन करताना केले.
पदव्युत्तर विधि विभागात पार पडलेल्या कार्यक्रमाला आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. संजय कविश्वर, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल, विभागप्रमुख डॉ. पायल ठावरे यांची उपस्थिती होती.
संगणक लॅबचे उद्घाटन केल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कुलगुरू डॉ. चौधरी यांनी कोणतीही कायदेविषयक माहिती घ्यायची असेल तर विद्यार्थ्यांना इंटरनेटची मदत घ्यावी लागते. प्रत्येक क्षेत्रात संगणक महत्त्वपूर्ण झाले असून, गत १५ वर्षांत त्याची गरज वाढली आहे. विद्यापीठ म्हणून विविध सरकारी संस्था ऑनलाईन परीक्षा घेण्याकरिता संगणक लॅब बाबत विचारणा करतात. या दृष्टीने सुसज्ज अशी भव्य संगणक लॅब तयार करण्याची विचाराधीन असल्याचे कुलगुरू म्हणाले. विभागाकडून सुरू करण्यात आलेली संगणक लॅब विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, तसेच अन्य न्यायालयातील निकालाबाबत अपडेट करेल. संशोधनासाठी विद्यार्थ्यांना येथे सुविधा मिळणार आहे.
प्रास्ताविक करताना विभागप्रमुख डॉ. पायल ठावरे यांनी सुसज्ज अशी डिजिटल संगणक लॅब सुरू होत असल्याने आनंद व्यक्त केला. अधिष्ठाता डॉ. संजय कविश्वर यांनी विभागाला भेट दिल्यानंतर लॅबची गरज व्यक्त केली होती.