नागपूर : अभंग देखील कौशल्यच आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी खंजेरी भजनाच्या माध्यमातून लोकप्रबोधन केले. अभंग हे रंजक शिक्षण आहे. रंजक शिक्षणातून उद्बोधन मनात रुजते. अभंगातून होत असलेले उद्बोधन मनात रुजविण्याचे काम राष्ट्रसंतांनी केले, असे प्रतिपादन माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजनागपूर विद्यापीठाच्या शताब्दी पर्व निमित्त आयोजित राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
विद्यापीठाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र व दहेगाव (रंगारी) येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावनेर तालुक्यातील दहेगाव (रंगारी) येथे ही भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी आयोजित उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी होते. तर प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी येथील सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, विद्यापीठ मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, माजी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय वाटमोडे, शताब्दी महोत्सव कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष कसबेकर, ज्ञानेश्वरदादा रक्षक, विद्यापीठ रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र प्रमुख डॉ. विजयालक्ष्मी थोटे, पुंडलिकराव चौधरी यांची विशेष उपस्थिती होती.
- रविवारी पुरस्कार वितरण
राज्यस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र वितरण रविवार १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील होईल. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर प्रमुख अतिथी राहतील.