लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने परीक्षांबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ५० टक्के परीक्षांची जबाबदारी महाविद्यालयांकडे देण्यात आली आहे. २०२१-२२ च्या पहिल्या सत्रापासून याची अंमलबजावणी होणार असून, २०२३ पासून सर्व विषम सत्रांच्या परीक्षा विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयांनाच घ्याव्या लागणार आहेत. यासंदर्भात विद्यापीठाने अधिसूचना जारी केली असून, यामुळे विद्यापीठाचे ओझे हलके होणार आहे, तर दुसरीकडे महाविद्यालयांतील प्राध्यापकांवरील ताण वाढणार आहे.
डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे कुलगुरू असताना ५०-५० परीक्षांचा फॉर्म्युला त्यांनी प्रस्तावित केला होता. परंतु त्याला महाविद्यालयांचा विरोध झाला होता. यासंदर्भात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी पुढाकार घेतला व ९ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव संमत करण्यात आला. १३ ऑगस्ट रोजी व्यवस्थापन परिषदेनेदेखील हिरवी झेंडी दिली होती. यासंदर्भात विद्यापीठाने अधिसूचना जारी केली आहे.
यानुसार या सत्रापासून पहिल्या सत्राच्या परीक्षा महाविद्यालयांना घ्यायच्या आहेत. हिवाळी २०२२ पासून पहिल्या व तिसऱ्या तर २०२३ पासून सर्व विषम सत्रांच्या परीक्षांचे आयोजन महाविद्यालयांना करावे लागणार आहे. राज्य शासनाच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ज्यांचे प्रवेश होत नाहीत, अशा अभ्यासक्रमांच्या परीक्षा या पद्धतीने होणार आहेत. यासंदर्भातील विस्तृत नियमावली लवकरच जारी करण्यात येईल, असे कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी स्पष्ट केले.
महाविद्यालयांमध्ये नाराजीचा सूर
विद्यापीठाच्या या निर्णयावरून महाविद्यालयांमध्ये नाराजीचा सूर आहे. अगोदरच अनेक ठिकाणी प्राध्यापकांची कमतरता आहे. त्यातच वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण करणे, विविध समित्यांच्या दौऱ्याची तयारी करणे व इतर प्रशासकीय कामांत प्राध्यापक पूर्णत: व्यस्त असतात. अशा स्थितीत परीक्षादेखील घेण्याची जबाबदारी आली, तर ताण वाढणार असल्याची भावना एका मोठ्या महाविद्यालयातील प्राचार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली. प्राचार्य फोरम यासंदर्भात प्राध्यापकांची बाजू उचलून धरेला का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विद्यापीठाकडे परीक्षा घेण्याचेच काम होते. आता तेदेखील ५० टक्क्यांनी कमी होणार असेल तर ते त्यांच्या सोयीचेच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांकडून परीक्षा
बीए. बीएस्सी, बीकॉम, बीबीए, बीसीसीए, बीसीए, बीए (आरएस), बीएस्सी (गृहविज्ञान), बीएस्सी (आयटी), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीसीटी, बीएफडी, बीआयडी, बीटीएस, बीजेडी, बीएस्सी (फायनान्स), बीव्होक, बीएसडब्लू, बी.लिब. व इतर