आॅनलाईन लोकमतनागपूर : ‘शिवा’ या अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने कपिलधार बीड येथे आयोजित राज्यव्यापी वार्षिक मेळाव्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला यंदाच्या राष्ट्रीय उत्कृष्ट संस्था शिवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्रदान सोहळ्यात शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, आ. विनायक मेटे प्रमुख अतिथी होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम यांना सन्मानचिन्ह व मानपत्र प्रदान करून त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला. देशातील वीरशैव-लिंगायत समाजात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शिवा संघटनेच्या या राष्ट्रीय पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची निवड शिवा संघटनेच्यावतीने जाहीर करण्यात आली होती. पुरस्काराचे हे १६ वे वर्ष आहे. नागपूर विद्यापीठ हे मागील सात वर्षांपासून कै. मनोहरराव कल्लावार यांच्या स्मरणार्थ दरवर्षी १२ जुलै रोजी महात्मा बसवेश्वर व्याख्यानमाला आयोजित करते. हे शिक्षण क्षेत्रासह समाजात प्रबोधन व परिवर्तनाचे अत्यंत मोठे कार्य आहे. या योगदानाबद्दल नागपूर विद्यापीठाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.