लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवार ९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत संघाच्या कार्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुढील कार्यविस्तारावर या सभेत मंथन होईल. तत्पूर्वी, बुधवारी देशभरातून आलेल्या प्रांत प्रचारकांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. दुपारभर चाललेल्या या बैठकीत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हेदेखील उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, देशभरातून जवळपास सर्व निमंत्रित प्रतिनिधी रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले असून त्यांची परिसरात चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.दरवर्षी संघाची प्रतिनिधी सभा होत असते. परंतु तीन वर्षांनी ही सभा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या नागपुरात होत असते. संघात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. यंदा होणाऱ्या अखिल भारतीय सभेत संघाच्या कारभाराची धुरा सांभाळणाऱ्या सरकार्यवाह या पदाची निवड होणार आहे. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या निवड प्रक्रियेत सहभागी होतील. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत भारतीय किसान संघ, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष यांच्यासह संघ परिवारातील ३५ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सभेत मांडण्यात येणाºया प्रस्तावांवर त्यांच्या उपस्थितीत चर्चा होईल. याचप्रमाणे विविध संघटनांचे प्रतिनिधी त्यांच्या कामाचा लेखाजोगा संक्षिप्तपणे मांडतील.अ.भा.प्रतिनिधी सभेसाठी सोमवारपासूनच बैठका सुरू झाल्या. बुधवारी प्रांत प्रचारकांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. दुपारी दीडच्या सुमारास सुरू झालेली ही बैठक सायंकाळी साडेपाच नंतर संपली. या बैठकीला सरसंघचालकांसोबतच सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, इंद्रेश कुमार प्रामुख्याने सहभागी झाले होते. मागील तीन वर्षांतील संघविस्तार कार्याचा आढावा यात मांडण्यात आला. सोबतच भविष्यातील कार्यविस्तार उपक्रमांवरदेखील चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
१८ टक्क्यांनी वाढल्या शाखा
सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत मागील तीन वर्षात संघ विस्ताराच्या मुद्यांचा आढावा मांडण्यात आला. २०१५ ते २०१८ या कालावधीत संघाच्या शाखांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात दैनंदिन शाखा, साप्ताहिक मिलन व मासिक मिलन यांचा समावेश आहे.विमानतळ, रेल्वे स्थानकांवर नियोजनबद्ध स्वागतबुधवारीदेखील संघ परिवारातील विविध संघटनांचे पदाधिकारी संघभूमीत दाखल झाले. विमानतळ व रेल्वे स्थानकांवर निमंत्रितांचे स्वागत करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. संघाचे स्थानिक पदाधिकारी, स्वयंसेवक यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी देखील धावपळ करताना दिसत होते. प्रत्येक निमंत्रिताची व्यवस्था कुठल्या वाहनात करण्यात आली आहे, रेशीमबागेत त्यांची निवासव्यवस्था कशी आहे, इथपासून ते अगदी त्यांच्या नोंदणीर्पयत सर्व माहिती त्यांना देण्यात येत होती. रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील कार्यालयात सभा साहित्याचे वाटप सुरू होते.