योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : नागपूरशी सुरुवातीपासूनच नाळ जुळलेल्या टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा यांचा साधेपणा नागपूरकरांनीदेखील अनुभवला होता. ७९ व्या वाढदिवशी सेलिब्रेशन करण्याऐवजी टाटा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात पोहोचले होते व तेथे त्यांनी विदर्भातील विविध सेवाकार्यांची माहिती जाणून घेतली होती. विशेष म्हणजे, संघानेदेखील परंपरेला छेद देत टाटा यांचे अक्षरश: रेड कार्पेट स्वागत करत त्यांचा नागपुरी पद्धतीने आदरसत्कार केला होता.
२८ डिसेंबर २०१८ रोजी बुधवारी रतन टाटा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेऊन सुमारे २० मिनिटे चर्चा केली. सायरस मिस्त्री यांना बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर टाटा समूह काहीशा संकटातून जात होता. त्या कालावधीत टाटा यांनी नागपूरला भेट दिली होती. त्यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी त्यांनी बंदद्वार चर्चा केली होती.
संघाने दिला होता परंपरेला छेदसाधारणत: संघ मुख्यालयात देशातील मोठ्या असामींची वर्दळ असतेच. मात्र कुणालाही संघातर्फे विशेष वागणूक दिली जात नाही. मात्र रतन टाटांसाठी मात्र संघाने अक्षरश: ‘रेड कार्पेट’च अंथरले होते. विमानतळावरील त्यांच्या आगमनापासून अखेरपर्यंत संघ पदाधिकारी त्यांच्यासमवेत होते. नागपूर विमानतळावर देखील त्यांचे स्वागत करण्यात आले होते.
नागपूरकरांना बसला होता आश्चर्याचा धक्कात्या दिवशी टाटा अचानक नागपुरात दाखल झाले व ते विमानतळाच्या बाहेर निघाल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यांनी रेशीमबाग येथे जाऊन आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले होते. त्यावेळी त्यांनी संघाच्या विविध प्रकल्पांविषयी जाणून घेतले होते. संघाच्या समाजकार्यात सहभागी होण्याची इच्छा त्यांनी यावेळी प्रदर्शित केली होती. या भेटीनंतरच चंद्रपूर जिल्ह्यातील अत्याधुनिक बांबू प्रशिक्षण केंद्राबाबत टाटा ट्रस्टने सामंजस्य करार केला होता.
२०१९ मध्ये अखेरची नागपूर भेट
१८ एप्रिल २०१९ रोजीदेखील रतन टाटा नागपुरात आले होते व त्यांनी संघ मुख्यालयात सरसंघचालकांशी चर्चा केली होती. त्याच वर्षीच्या संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमासाठी संघाने टाटा यांना निमंत्रण दिले होते. मात्र कार्यव्यस्ततेमुळे त्यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणे जमणार नसल्याचे कळविले होते.