संदीप दाभेकर
नागपूर : साेशल मीडियामध्ये काेणतेही विधान महान व्यक्तीच्या नावे प्रसारित करण्याचा प्रकार सर्रासपणे हाेताे. मात्र, हा प्रकार बाेर्डाच्या परीक्षेतही व्हावा, हे आश्चर्यच आहे. उद्याेगपती रतन टाटा यांच्या नावाने साेशल मीडियामध्ये प्रसारित हाेणारे एक फेक वक्तव्य बारावीच्या बाेर्डाच्या परीक्षेतही नमूद केल्याने गाेंधळ उडाला आहे.
राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाली. पहिला पेपर इंग्रजीचा हाेता. व्याकरणाच्या अनेक चुकांमुळे चर्चेत असलेला हा पेपर आणखी एका गाेंधळामुळे चर्चेत आला आहे. प्रसिद्ध उद्याेगपती रतन टाटा यांच्या नावाचे हे बनावट काेट चक्क इंग्रजीच्या पेपरमध्ये टाकलेले आहे. प्रश्नपत्रिकेच्या सेक्शन-१ मध्ये दुसरा प्रश्न हा रतन टाटा यांच्याशी संबंधित आहे. या १८ गुणांच्या प्रश्नात टाटा यांच्याबद्दल न पाहिलेला उतारा दिलेला आहे. परीक्षेसाठी प्रश्न निवडण्याचे निकष प्रामाणिक आणि विश्वासार्ह असावेत असा नियम आहे. मात्र, परीक्षेसाठी हा उतारा देण्यापूर्वी योग्य ती दक्षता घेण्यास राज्य शिक्षण मंडळ नियमांना विसरल्याचे दिसते.
‘लाेकमत’ने याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांना ही चूक लक्षात आणून दिली. या मुद्यावर सविस्तर माहिती नसल्याने काही बाेलण्यास गाेसावी यांनी नकार दिला. मात्र, मंडळाच्या नियंत्रण समितीच्या लक्षात ही चूक का आली नाही, असा सवाल शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. एका प्रशासकीय अधिकाऱ्याने नामाेल्लेख न करण्याच्या अटीवर सांगितले की, परीक्षेत एखादा उतारा देताना अनेकदा क्राॅसचेक केला जाताे. उतारा घेतलेल्या स्राेताची प्रामाणिकता व विश्वासार्हतेची अनेकदा छाननी केली जाते. त्यामुळे अशा प्रकारचे असत्य साहित्य परीक्षेत घेण्यासाठी बाेर्डाची स्क्रुटिनी समिती जबाबदार आहे. त्यामुळे असत्य विधान असलेला अनाेळखी उतारा परीक्षेत आलाच कसा, हे आश्चर्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
बाेर्डाने नवीन पॅटर्न स्वीकारल्यानंतरची ही पहिली परीक्षा आहे. मात्र, या प्रश्नपत्रिकेत बाेर्ड पॅटर्न पाळला गेला नाही आणि व्याकरणाच्या अनेक चुकाही केल्याचे दिसत असल्याची माहिती नूतन कन्या विद्यालय, भंडाराचे प्रा. नदीम खान यांनी दिली. खान हे इंग्रजीच्या ऑनलाइन प्रकल्पाचे राज्य शैक्षणिक समन्वयक आहेत. फेसबुक, व्हाॅटस्ॲपसारख्या साेशल मीडियावर येणाऱ्या चुकीच्या माहितीवर अनेक जण डाेळे बंद ठेवून विश्वास ठेवतात. मात्र, अशी चुकीची माहिती शिक्षणात येणे हा गंभीर प्रकार आहे. त्यामुळे जबाबदार प्रशासनाने उतारा निवडण्यापूर्वी त्याची विश्वासार्हता तपासणे आवश्यक हाेते, असे मत त्यांनी मांडले.
ते फेक वक्तव्य
हा अनाेळखी उतारा टाटांच्या वक्तव्याने सुरू हाेतो. ‘मी याेग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नाही. मी आधी निर्णय घेताे आणि नंतर ताे याेग्य करताे’, असे हे वक्तव्य आहे. टाटा यांनी यापूर्वी असे काेणतेही वक्तव्य केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. माझ्या बाेलण्याने तुम्ही निराश व्हाल; पण हे वक्तव्य फेसबुक किंवा ट्विटरकडून आले आहे. मी कधीही असे वक्तव्य केले नाही, असे सांगणारा टाटा यांच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहे.