योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शोक व्यक्त करण्यात आला आहे. भारताच्या विकासयात्रेत रतन टाटा यांचे मौलिक योगदान असल्याची भावना सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी व्यक्त केली.
रतन टाटा यांच्या निधनाने सर्व भारतीयांना वेदना झाल्या आहेत. देशाने त्यांच्या स्वरुपात एक मौलिक रत्न गमावले आहे. उद्योगांच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात त्यांनी अनेक प्रभावी पुढाकार घेतले व सर्वश्रेष्ठ मापदंड प्रस्थापित केले. समाजाच्या हितासाठीदेखील ते कार्यरत होते व ते स्वत: अनेक उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचे. राष्ट्राची एकता, देशाची सुरक्षा, विकासाचे मुद्दे, कर्मचाऱ्यांचे हित यासाठी रतन टाटा हे त्यांचा वेगळा विचार व कार्याने प्रेरणादायी राहिले. यशाची अनेक शिखरे गाठल्यानंतरदेखील त्यांच्या वर्तणूकीत सहजभाव, विनम्रता व आत्मियता असायची व त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हा पैलू अनुकरणीय आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असे प्रतिपादन डॉ.भागवत व होसबळे यांनी केले.
संघाशी आत्मियतेचे संबंधरतन टाटा यांचे संघाशी आत्मियतेचे संबंध होते. त्यांनी नागपुरात येऊन संघ मुख्यालयाला दोनदा भेटदेखील दिली होती. २८ डिसेंबर २०१६ रोजी अचानक नागपुरात येत त्यांनी संघकार्य जाणून घेतले होते. तर एप्रिल २०१९ मध्ये त्यांनी परत संघ मुख्यालयात भेट देत सरसंघचालकांशी चर्चा केली होती. ती त्यांची अखेरची नागपूर भेट ठरली होती.