नागपूर : स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विमा मदतीमध्ये जिल्ह्यात रस्ता अपघाताचे प्रमाण अधिक आहे. मागील २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण १४६ प्रकरणे दाव्यासाठी आली होती. त्यातील सर्वाधिक म्हणजे ६६ प्रकरणे रस्ता अपघातांची होती. यावरून शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही रस्ता अपघाताची स्थिती बिघडत चालली, असेच यावरून दिसत आहे.
अलिकडे शेतकऱ्यांचा शहरासोबतचा संपर्क वाढला आहे. थेट बाजारपेठेत माल विक्रीसाठी नेला जात असल्याने वाहनांचा आधार घेतला जातो. पूर्वी ही वाहतूक बैलगाड्यांनी व्हायची; मात्र आता बैलांची आणि बैलगाड्यांची संख्या खेड्यातही घटली आहे. बरेचशे शेतकरी दुचाकीवरून भाजीपाला, फळभाज्या बाजारात विक्रीसाठी आणतात. अर्थात वजन अधिक असल्याने संतुलन राखणे महत्त्वाचे असते. ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खाचखळगे सांभाळताना अपघात झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अनेक शेतकरी दुधाचा जोडधंदा करतात. दुधाच्या केटल्यांची दुचाकीवरून होणारी वाहतूकही बरेचदा अपघाताला निमंत्रण देणारी ठरते.
रस्ता अपघातासोबतच पाण्यात बुडण्याच्या घटनाही अधिक आहेत. अशा २२ प्रकरणांची नोंद २०२०-२१ या वर्षात झाली आहे. या पाठोपाठ विजेच्या धक्क्याने १४ आणि सर्पदंशाने १३ जणांचा वर्षभरात जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. तर वीज पडल्याने ९ जणांच्या मृत्यूची नोंद आहे.
...
वर्षभरातील शेतकरी अपघात विम्याचे दावे
रस्ता अपघात - ६६
वीज पडणे - ९
विजेचा धक्का - १४
बुडणे - २२
विषबाधा - ४
सर्पदंश - १३
वाघांचा हल्ला - १
बैलाचा हल्ला - ४
खून - ४
रेल्वे अपघात - १
झाडावरून पडणे - १
छत कोसळणे - १
जळणे- २
बायोगॅसचा स्फोट - २
...
अनेकांकडे परवानेच नाहीत
रस्ता अपघाती मृत्यूच्या घटनांमध्ये अनेकांकडे वाहन चालविण्याचे परवानेच नसल्याने तसेच वाहनांची कागदपत्रे नसल्याने मदत नाकारली गेली आहे. काही मृतांच्या शवविच्छेदन अहवालात अल्कोहोलचे प्रमाण नोंदविले गेल्याने अशा प्रकरणातही मृतांच्या नातेवाइकांना मदतीपासून वंचित राहावे लागले आहे.
...