लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : काेराेना काळात लाभार्थ्यांना धान्य वाटप करताना ई-पाॅस मशीनवर नाॅमिनी अंगठा लावण्याची मुभा देण्याची मागणी रामटेक तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार बाळासाहेब मस्के यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. ही मुभा न दिल्यास १ मेपासून (शनिवार) संपावर जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. रेशन दुकानदार संपावर गेल्यास काेराेना काळात धान्य वितरणाची समस्या ऐरणीवर येण्याची शक्यता बळावली आहे.
शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप करताना ई-पाॅस मशीनचा वापर करणे अनिवार्य केले आहे. या मशीनवर लाभार्थ्यासाेबतच दुकानदाराचा अंगठा नाेंदवावा लागताे. मागील काही दिवसापासून रामटेक शहर व तालुक्यात काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या मशीनवर अंगठा नाेंदविताना काेराेना संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लाभार्थ्यासाेबतच दुकानदारांसाठीही घातक ठरू शकते. त्यामुळे काेराेना संक्रमण काळात केवळ नाॅमिनी अंगठा नाेंदविण्याची मुभा द्यावी, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघाने तहसीलदार बाळासाहेब मस्के यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
यासंदर्भात १२ एप्रिल राेजी राज्य शासनाला निवेदन देऊन ताेडगा काढण्याची मागणी करण्यात आली हाेती. मात्र, शासनाने यावर अद्यापही सकारात्मक निर्णय घेतला नाही. आता दुकानदारांना काेराेनाची लागण हाेत असून, काहींचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे ही समस्या तातडीने साेडविण्याची मागणी करण्यात आली असून, शनिवारपासून संपावर जाण्याचा इशाराही देण्यात आला. शिष्टमंडळात स्वस्त धान्य दुकानदार संघाचे अध्यक्ष रामचंद्र अडमाची, सचिव नीलकंठ महाजन, रमेश माेहने यांच्यासह सदस्यांचा समावेश हाेता.