लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सनातन धर्म युवा सभेच्या वतीने कस्तुरचंद पार्क मैदानात गेल्या ६८ वर्षांपासून आयोजित केला जात असलेला रावणदहनाचा कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.गेल्या ६८ वर्षांपासून सनातन सभेच्या वतीने विजयादशमीच्या पर्वावर कस्तुरचंद पार्क येथे रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित केला जात होता. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन होत असते. यासाठी नागपूर आणि नजिकच्या खेड्यांतून लाखोंच्या संख्येने नागरिक जमताता. रामायणातील लघुनाट्याचा आस्वादही दरवर्षी घेता येत होता. यावेळी होणारा फटाका शो आकर्षणाचे केंद्र ठरत असते. मात्र, कोरोना संसर्गाचा प्रसार थांबावा या हेतूने सनातन धर्म युवा सभेने रावणदहनाचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.प्रतीकात्मक दहनजाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आला असला तरी ही परंपरा खंडित पडू नये म्हणून कडबी चौकातील सनातन धर्म युवा सभेच्या प्रांगणात प्रतीकात्मक पद्धतीने रावणदहन होईल. केवळ मर्यादित सदस्यांच्याच उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल, अशी माहिती सभेचे सरचिटणीस संजीव कपूर यांनी दिली.
रावणदहनाचा कार्यक्रम रद्द : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सनातन सभेचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 11:30 PM