कळमेश्वर (नागपूर) : गोंडखैरी बरड (ता. कळमेश्वर) येथील रामकृष्ण मारवाडी यांच्या बंगल्यात सुरू असलेल्या ‘रेव्ह पार्टी’वर शनिवारी मध्यरात्री १.४५ वाजताच्या सुमारास नागपूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकली. त्यात सहा तरुण, सात तरुणी व एक महिला अशा एकूण १४ जणांना अटक केली. त्यांच्याकडून कार, ‘हुक्का पार्लर’चे साहित्यासह एकूण ३ लाख ५७ हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. ‘रेव्ह पार्टी’वर धाड टाकण्याची नागपूर जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील ही पहिलीच कारवाई होय.अलीकडच्या काळात गोंडखैरी परिसरात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढल्याने पोलीस त्या धंद्यांवर नजर ठेवून आहेत. त्यातच रामकृष्ण मारवाडी यांच्या गोंडखैरी बरड येथील घरी ‘रेव्ह पार्टी’ सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे त्यांच्या नेतृत्वातील विशेष पथकाने मारवाडी यांच्या बंगल्याची पाहणी केली. तिथे ‘हुक्का पार्लर’ व डीजेच्या तालावर मद्य प्राशन केलेले तरुण-तरुणी डान्स करीत असल्याचे तसेच अन्य आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या. यात एका महिलेसह सहा तरुण आणि सात तरुणींना ताब्यात घेत अटक करण्यात आली.त्यांच्याकडून कार, एलईडी टीव्ही, लॅपटॉप, साऊंड आॅपरेटर मशीन, एटीएम कार्ड स्वाईप मशीन, ‘हुक्का पार्लर’चे साहित्य असा एकूण ३ लाख ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.या पथकात परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, कळमेश्वरचे ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे, उपनिरीक्षक धोकटे, लखन महाजन, पुरुषोत्तम काकडे यांच्यासह कळमेश्वर व काटोल ठाण्यातील निवडक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.अटक करण्यात आलेले संशयितमोरेश्वर सुरेश मेश्राम (३४), ललितसिंग उदयसिंग (१८), प्रदीप देवीदास गणवीर (२१), अजीम गुलाबखान पठाण (३२), राहुल शैलेंद्र दहाटे (२०), नीतेश गोविंदराव माहुरे (२०) यांच्यासह सात तरुणी आणि एका ५५ वर्षीय महिलेचा अटक झालेल्यांत समावेश आहे.
‘रेव्ह पार्टी’वर धाड; तरुणींसह १४ अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 1:21 AM