नागपूर : बाॅलिवूड अभिनेत्री रविना टंडनची पेंच व्याघ्र प्रकल्पाची सफारी यावेळी अभूतपूर्व ठरली. पेंच अभयारण्यातील ‘बघिरा’ म्हणजे दुर्मीळ काळ्या बिबट्याचे दर्शन झाले आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकला . हे दर्शन ‘अमेझिंग’ ठरले, अशी भावना तिने आपल्या साेशल अकाउंटवर व्यक्त केली.
रविना टंडनला वन्यजीव छायाचित्रणाचा छंद असून, तिचे वन्यजीव प्रेमही बाॅलिवूडमध्ये परिचित आहे. रविना पेंच आणि ताडाेबा व्याघ्र प्रकल्पाला नियमित भेट देत असते. नुकतेच तिने पेंच व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली हाेती. तिने खवासा / तेलिया गेटमधून जंगल सफारी केली आणि तिच्या टीमसह येथील रिसाेर्टमध्ये मुक्कामही केला. या भेटीचे छायाचित्र तिने तिच्या साेशल मीडिया अकाउंटवर पाेस्ट केले. जंगल सफारी करताना बघिरा म्हणून ओळख असलेल्या काळ्या बिबट्याचे दर्शन घडल्याचे तिने नमूद केले. या बघिराचे दर्शन हाेणे दुर्मीळ मानले जाते. ‘अपेक्षा नसताना बघिरा’चे दर्शन हाेणे निव्वळ ‘अमेझिंग’ हाेते, असे तिने पाेस्टमध्ये नमूद केले. रात्रीही सफारी केल्याचे सांगत, ही भेट अविस्मरणीय ठरल्याची भावना तिने व्यक्त केली.