लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुचर्चित डब्बा प्रकरणात सहभागी असलेल्या व्यापारी रवि अग्रवालची मंगळवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चौकशी केली. बुकी व हवाला व्यापाऱ्यांच्या चौकशीनंतर आता त्यांनी डब्बा प्रकरणावरदेखील लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे या प्रकरणाशी जुळलेल्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
६ सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्तांनी आर्थिक अपराध शाखेच्या कामाचा आढावा घेतला होता. यावेळी डब्बा प्रकरणाच्या चौकशीवरुन त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती. मे २०१६ पासून शहर पोलिसांकडे हे प्रकरण आहे. यात ९ गुन्हे दाखल असून २४ डब्बा व्यापारी आरोपी आहेत. १० आरोपींना अटक करण्यात आली असून १४ जणांना उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. हे प्रकरण अद्यापही अडकलेले आहेत. ठोस पावले न उचल्यामुळे पोलीस आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती व त्यांनी रवि अग्रवालला चौकशीसाठी बोलविले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवि अग्रवालची एक तास चौकशी करण्यात आली. इतरही आरोपींना लवकरच बोलविण्यात येईल, अशी चर्चा आहे.