नागपूर : भारतीय संघातील माजी स्टार क्रिकेटर, भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक व प्रसिद्ध कमेंट्रेटर रवी शास्त्री हे आपल्या कुटुंबीयांसह पेंच व्याघ्र अभयारण्याच्या दर्शनास आले आहेत. शुक्रवारी त्यांना खुर्सापार गेटवर शिकारीसाठी हरिणीचा भरधाव वेगात पाठलाग करणाऱ्या पट्टेदार वाघिणीचे दर्शन घडले.
पेंच व्याघ्र प्रकल्पातील खुर्सापार गेट वाघाच्या दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून व्याघ्रदर्शनाचे प्रमुख स्थळ म्हणून पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. त्यामुळेच अनेक सेलिब्रिटींसाठीही हे पसंतीस उतरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रवी शास्त्री यांनीही कुटुंबीयांसह या खुर्सापार गेटला भेट दिली.
रवी शास्त्री यांच्या भेटीत नॅट एड्यू फाउंडेशनचे डॉ. उमेश क्रिष्णा सोबतीला होते. या भेटीत रवी शास्त्री मध्य प्रदेशकडील पेंच रिझर्व्ह भागात काही दिवस वास्तव्याला होते आणि त्यांनीच महाराष्ट्रातील पेंच टायगर रिझर्व्हला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेला महाराष्ट्र वन विभागाने सन्मानाने मान्यता दिली आणि खुर्सापार गेटवर त्यांचा सत्कारही केल्याचे डॉ. उमेश क्रिष्णा यांनी सांगितले. या भेटीत रवी शास्त्री यांना भारतीय गौर, सांबर, हरीण, चार सिंग असलेले हरीण, विविध प्रकारची वनसंपदा आणि हरिणीचा पाठलाग करणाऱ्या वाघिणीचे दर्शन घेता आले. त्यांच्यासाठीचा हा अविस्मरणीय असा क्षण असल्याचे ते म्हणाल्याचे डॉ. उमेश क्रिष्णा यांनी सांगितले. क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही बॅटिंगला उतरता तेव्हा तुम्हाला विचार करण्यास वेळ नसतो. केवळ प्रदर्शन करणे, हेच ध्येय असते. कधी यश तर कधी अपयश मिळत असल्याचेही शास्त्री म्हणाल्याचे डॉ. क्रिष्णा यांनी सांगितले.
...........