नागपूर : नागपूर विधानपरिषद निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी भाजपवर खोट्या बातम्या पसरविल्याचा आरोप केला आहे.
रवींद्र भोयर यांनी निवडणुकीतून पळ काढलाय, निवडणुकीतून माघार घेतली, त्यामुळे काँग्रेसने दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे अशा आधारहीन अफवा भाजपकडून पसरवल्या जात असल्याचा आरोप भोयर यांनी केला आहे. विधानपरिषदेची ही निवडणूक जनतेत जाऊन प्रचार करणारी मास निवडणूक नाही, अवघे ५६० मतदारांची ही निवडणूक आहे. या सर्व मतदारांच्या संपर्कात असून दिवसरात्र प्रचार करत असल्याचे भोयर म्हणाले.
भाजपला कनव्हिन्स करता येत नाही, म्हणून कन्फ्यूज करत आहे असा आरोपही छोटू भोयर यांनी केला आहे. गेल्या काही दिवसात छोटू भोयर यांनी निवडणुकीतून पळ काढल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरल होतं. त्यानंतर आज खुद्द छोटू भोयर यांनी माध्यमासमोर येऊन स्पष्टीकरण दिलं आहे.
बसपा तटस्थ आणि एमआयएमचा बहिष्कार
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत बसपानं तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे वर्सेस छोटू भोयर यांच्यात लढत होईल. बसपा तटस्थ राहणार असल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढणार आहेत. आमच्यासाठी काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही उमेदवार सारखेच असल्याचं बसपाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. संदीप ताजणे म्हणाले. तर, काँग्रेसने संघाचा उमेदवार आयात केल्याने एमआयएमनेदेखील या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे एमआयएमचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शकीबुर रेहमान यांनी सांगितले.