नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी, काँग्रेस पक्षातून छोटू भोयर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर केला.
भाजपचे नगरसेवक छोटू (रविंद्र) भोयर यांनी रविवारी रात्री भाजपकडे आपला राजीनामा सोपवला होता. त्यांनी सोमवारी सकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला व त्याच रात्री त्यांना उमेदवारी जाहीर झाली. आज त्यांनी काँग्रेस पक्षातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पालकमंत्री नितीन राऊ, शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, मंत्री सुनील केदार, अभिजित वंजारी, राजेंद्र मुळक आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून घडलेले व मागील २४ वर्षांपासून भाजपच्या नागपुरातील प्रवासातील महत्त्वाचा भाग राहिलेले नगरसेवक छोटू भोयर यांनी रविवारी भाजपला टाटाबायबाय करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपमध्ये छळ झाल्याचा आरोप केला होता. भोयर हे १९८७ पासून भाजपसाठी काम करत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखालीच त्यांनी भाजपचं काम सुरू केलं होतं.
दरम्यान, नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी अर्ज भरला असला तरी, कार्यकर्त्यांमध्ये चर्चा भोयर यांच्या राजीनाम्याचीच होती. इतके वर्ष भोयर भाजपमध्ये होते व पक्षाने त्यांना संधीदेखील दिली. असे असताना मनातील नाराजी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडण्यापेक्षा ते प्रसारमाध्यमात का गेले, असा सवाल भाजपच्याच एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर केला. भोयर यांनी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा का केली नाही, असा सवालदेखील पदाधिकारी उपस्थित करत होते. मात्र, फडणवीस व गडकरी या दोघांनीही या विषयावर काहीच भाष्य केलं नाही.