योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपमधून कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यावर लगेच विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची उमेदवारी भेटलेल्या रवींद्र भोयर यांनी मंगळवारी नामांकन अर्ज दाखल केला. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रानुसार भोयर यांच्या चल व अचल संपत्तीचा आकडा पावणेचार कोटींच्या घरात आहे. २०१७ सालापासून भोयर यांच्या संपत्तीच्या एकूण मूल्यांकनात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे.
२०१७ साली भोयर यांनी भाजपच्या तिकिटावर प्रभाग ३१ मधून निवडणूक लढविली होती. त्यावेळी भोयर व कुटुंबीयांच्या नावाने असलेली संपत्ती १ कोटी ६० लाखांहून अधिक होती. सद्यस्थितीत भोयर यांची एकूण संपत्ती ३ कोटी ७८ लाख २४ हजार ८५५ इतकी झाली आहे. त्यांच्या नावे ५३ लाख २४ लाख ८५५ रुपयांची चल संपत्ती असून उर्वरित संपत्ती अचल आहे. अचल संपत्तीच्या मूल्यांकनात पाच वर्षांत वाढ झाली आहे.
भोयरांविरोधात तीन गुन्हे
रवींद्र भोयर यांच्याविरोधात एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. यातील एक गुन्हा गुन्हेगारी अतिक्रमणाचा असून दुसरा गुन्हा मानवी जीवनाच्या व्यक्तिगत सुरक्षेला धोक्यात टाकण्यासंदर्भातील आहे.
८० टक्के उमेदवारांविरोधात गुन्हे
या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यापैकी एक अपक्ष उमेदवार वगळता इतर सर्व उमेदवारांविरोधात विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. यातील बहुतांश गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे आहेत.
६० टक्के उमेदवारच पदवीधर
निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्यांपैकी तीनच उमेदवारांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. एका उमेदवाराची पदवी पूर्ण होऊ शकली नाही. तर एका उमेदवाराचे शिक्षण केवळ चौथीपर्यंतच झाले आहे.
६० टक्के उमेदवार कोट्यधीश
पाच उमेदवारांपैकी तीन उमेदवार सधन आहेत. तर एका उमेदवाराची संपत्ती केवळ ३५ हजार रुपये इतकी आहे. कोट्यधीश असलेल्या तीनही उमेदवारांनी याअगोदर विधानसभा किंवा नागपूर महानगरपालिकेची निवडणूक लढविली आहे. २०१४ व २०१७ च्या तुलनेत या उमेदवारांच्या संपत्तीत अनेक टक्क्यांनी वाढ झाली आहे.