लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ साहित्य संघ आणि चांदा क्लब चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय साहित्य आणि संस्कृती महोत्सवाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांची एकमताने निवड झाली आहे. २१, २२ व २३ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथे चांदा क्लब मैदानावर हे संमेलन होणार आहे. डॉ. शोभणे यांना मराठी साहित्य विश्वात कथाकार, कादंबरीकार, समीक्षक, ललितनिबंधकार, संपादक म्हणून ओळखले जाते. १९८० पासून त्यांचा लेखन प्रवास सुरू झाला असून, त्यांचे साहित्य अन्य भाषांमध्येही प्रकाशित झाले आहे. त्यांना ललित लेखनासाठी लोकमत पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग.ल. ठोकळ पुरस्कार या पुरस्कारांसह विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी ते विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पाचव्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, बाराव्या समरसता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचा मान त्यांना मिळाला आहे. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष, अमरावती येथील अ.भा. सर्वसंत साहित्य समेलनाचे अध्यक्ष आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. त्यांच्या साहित्यावर विविध विद्यापीठांतून संशोधनही झाले आहे.
वि.सा.संघ साहित्य-संस्कृती महोत्सव अध्यक्षपदी रवींद्र शोभणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 8:32 PM