शरद मिरे
भिवापूर : तब्बल ३०० कि.मी. अंतरावरील निराळा (जि. नांदेड) ही त्यांची जन्मभूमी! शिक्षक म्हणून नोकरी लागताच कर्तव्य बजावण्याची पहिलीच संधी त्यांना भिवापूर तालुक्यात मिळाली. ज्या ज्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले त्या त्या शाळेलाच नव्हे तर अख्ख्या गावाला ‘ते’ हवेहवेसे झाले. सांकेतिक भाषेचा त्यांचा अभिनव उपक्रम जिल्हा परिषदेचे अधिकारी तर सोडाच विद्यापीठाच्या कुलगुरूंनाही प्रभावित करणारा ठरला. अशा या ध्येयासक्त शिक्षकाचे नाव अनिल राठोड असे आहे. पोलीसगिरीतून ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद जपणारा चित्रपटातील ‘रावडी राठोड’ सर्वांनाच माहीत आहे. त्याच प्रकारे अनिल राठोड हे अध्ययन व अध्यपनातील ‘रावडी राठोड’ ठरले आहेत. ते तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अड्याळ (पुनर्वसन) येथे शिक्षक (प्रभारी मुख्याध्यापक) आहेत. तब्बल २० वर्षांपूर्वी तालुक्यात रुजू झालेले अनिल राठोड शिक्षकीपेशासोबतच समाजप्रबोधन करणारे कलावंत, नकलाकारसुद्धा आहेत. व्यसनमुक्ती, साक्षरता, एड्स, वृक्षारोपणाचे महत्त्व समाजप्रबोधनाच्या माध्यमातून जिल्हाभर करतात. विद्यार्थ्यांना शाळा, शिक्षण व अभ्यासाची आवड निर्माण करणारा त्यांचा ‘सांकेतिक भाषेचा’ उपक्रम शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारा ठरला आहे. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या दिवसागणिक घसरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘छडी’चा मार न देता भाषेबद्दल, अभ्यासाबद्दल या उपक्रमातून गोडवा निर्माण होत आहे. अड्याळ हे गाव गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत पुनर्वसित असून, या गावाच्या शैक्षणिक विकासासह सर्वांगीण विकासाचे ध्येय उराशी बाळगून अनिल राठोड हा शिक्षक सतत धडपडत आहे. पुरस्काराची हाव आणि धावाधाव ते करीत नाही. मात्र त्यासाठी वरिष्ठांचा आग्रह सतत असतो.
असा आहे उपक्रम
विद्यार्थ्यांना लिहिता, वाचता येत नाही. अभ्यासाचा कंटाळा येतो. या अडचणीवर राठोड यांनी ‘सांकेतिक’भाषेचे ‘औषध’ शोधले आहे. बाराखडीप्रमाणे शरीराच्या प्रत्येक अवयवांना शब्दाचा ‘कोड’ दिला आहे. काना, मात्रा, वेलांटी, उकार यासाठी इशारे ठरविले आहे. विद्यार्थ्यांना या सांकेतिक शब्दांची ओळखपरेड तब्बल तीन महिने चालली. आता शाळेतील लहानात लहान विद्यार्थ्याला कागदावर मराठी, हिंदी, इंग्रजी यातील एखादा शब्द किंवा वाक्य, गणित लिहून दिल्यास सदर विद्यार्थी हातवारे इशारे करतो आणि समोर बसलेले असंख्य विद्यार्थी पटापट उत्तरे देतात.