लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या काही सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. यामध्ये तालुक्यातील मकरधोकडा आणि देवळी आमगाव या दोन सर्कलचा समावेश होता. मंगळवारी या रद्द जागांकरिता नव्याने आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये पुन्हा दोन्ही सदस्यांना निवडणूक लढविण्यासाठी मार्ग मोकळा झाला असून, त्यांच्यासाठी आशेचा किरण दिसून येत आहे.
मंगळवारी नव्याने आरक्षण सोडत निश्चित झाले. यामध्ये मकरधोकडा सर्कल सर्वसाधारण महिला गटाकरिता आरक्षित झाले. पूर्वी हे सर्कल नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटासाठी आरक्षित होते. देवळी आमगाव सर्कल नागरिकांचा मागास प्रवर्ग गटासाठी आरक्षित झाले होते. आता सदर सर्कल सर्वसाधारण गटाकरिता निश्चित झाले. उपरोक्त दोन्ही नवीन आरक्षित झालेल्या समीकरणामुळे शालू गिल्लूरकर (मकरधोकडा) आणि सुरेश लेंडे (देवळी आमगाव) यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. आरक्षणाच्या सोडतीनंतर दोघांनाही आपापल्या मतदारसंघात पक्षाने हिरवी झेंडी दिल्यास पुन्हा निवडणूक लढण्याची संधी आहे. तहसील कार्यालयात पार पडलेल्या आरक्षण सोडतीमध्ये उपजिल्हाधिकारी (भूसंपादन सामान्य) विजया बनकर, तहसीलदार प्रमोद कदम, नायब तहसीलदार टी.डी. लांजेवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.