लोकमतप्रेरणावाट
अमेरिकन युवकाचे असेही मदतकार्यनागपूर : उपराजधानीतील प्रत्येक एचआयव्हीबाधिताला औषधोपचार मिळतील आणि तेही प्रतिष्ठेने मिळावेत यासाठी एक अमेरिकन युवक गेल्या काही वर्षांपासून झटत आहे. त्यांना आधार देण्याचे काम करीत आहे. विना कुंचबणेशिवाय, कलंकाशिवाय त्यांना सन्मानाने जगविण्याचा, त्यांच्यात नवी उमेद निर्माण करण्याचा ध्यास त्याने घेतला आहे.त्या अमेरिकन युवकाचे नाव जेरी ह्युजेस मिनीसोटा. अमेरिकेत तो एका मोठ्या जाहिरात कंपनीतील उच्चअंकित पगारावर नोकरीवर आहे. २००३ मध्ये तो अमेरिकेतील एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नागपुरातील युवकांच्या भेटीसाठी आला असताना विमानतळावर त्याची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता एचआयव्हीबाधित असल्याचे निदान झाले. त्याने ही बाब लपवून न ठेवता आई-वडील आणि नातेवाईकांना सांगितली. मात्र यासाठी त्यांनी जेरीलाच जबाबदार धरले. जेरी संबंधातील नाते संपुष्टात आणले. या जबर धक्क्यातून जेरीने स्वत:ला सावरत एचआयव्हीबाधित मुलांसाठी कार्य करण्याचे ठरविले. त्याने ‘ह्युज’ नावाची संस्था स्थापन केली. सुरुवातीला एचआयव्हीबाधितांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना भेटी देऊन त्यांना आर्थिक मदत पुरविली. २००८ मध्ये एचआयव्हीबाधित वारांगणासाठी काम करीत असलेल्या समीर शिंदे यांच्याशी त्याची भेट झाली. जेरीने नागपुरातील एचआयव्हीबाधित मुलांच्या समस्या जाणून घेतल्या असता अनेक मुले रुग्णालयापर्यंत पोहचतच नसल्याचे त्याच्या लक्षात आले. तो स्वत: एचआयव्हीबाधित असल्याने एचआयव्ही संसर्गावर औषधोपचार केले तर आरोग्यपूर्ण आयुष्य जगता येते, हे त्याला माहीत होते. म्हणूनच औषधोपचारांमुळे मुलांचे आयुष्यमान आणि जीवनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी, त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, इतर आजाराची वाढ खुंटण्यासाठी आणि संसर्ग होण्याची शक्यता कमी करण्यासाठी त्यांना रुग्णालयापर्यंत पोहचविण्याचा ध्यासच त्याने घेतला.(प्रतिनिधी)रात्री बेरात्री फोन येताच तो धावतोजेरीने शिंदे यांचे जुने चारचाकी वाहन दुरुस्त केले. या वाहनातून एचआयव्ही बाधित मुलांना मेयो, मेडिकलच नाहीतर लता मंगेशकर हॉस्पिटलमधून ने-आण करण्याचे कार्य हाती घेतले. सुरुवातीला २० मुलांपासून हाती घेतलेले हे कार्य आता तीन हजारांच्या घरात गेले आहे. त्याला रात्री-बेरात्री फोन येताच तो धावतो. त्याला रुग्णालयापर्यंत पोहचवितो, त्यांच्या औषधोपचारातही मदत करतो. या शिवाय तो या मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले रहावे यासाठी त्यांना सहलीला घेऊन जातो. त्यांच्यासोबत खेळतो, त्यांचे वाढदिवस साजरे करतो. त्यांना औषधोपचाराची माहिती देतो. हे कार्य अखंड चालावे यासाठी त्याने भारताचे नागरिकत्व मिळविण्यासाठी प्रयत्नही चालविले आहे. परंतु तूर्तास त्याला यश आलेले नाही. गेल्या डिसेंबर महिन्यात ‘व्हिसा’ संपल्याने त्याला मायदेशी परतावे लागले. सप्टेंबर महिन्यात तो पुन्हा येत आहे, या मुलांच्या मदतीसाठी. त्यांना औषधे उपलब्ध करून देऊन त्यांच्या शरीराला शक्ती प्रदान करण्यासाठी, त्यांचे आयुष्यमान वाढविण्यासाठी.