नागपूर : रेमंड समूह रिटेल क्षेत्रात उतरणार आहे. वैविध्यपूर्ण योजनांचा एक भाग म्हणून समूह फॅब्रिकपासून सूट तयार करेल. मूल्यवर्धनामुळे भांडवल ते रोजगाराचे प्रमाण वाढणार असल्याचे मत रेमंड समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया यांनी व्यक्त केले.
गौतम सिंघानिया यांनी नागपूरपासून ३५ किमी अंतरावर कळमेश्वरजवळील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीच्या (आयएमटी) दीक्षांत समारंभानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पोलाद क्षेत्रानंतर वस्त्रोद्योग क्षेत्रात सर्वाधिक रोजगार निर्मितीची क्षमता आहे. १०० कोटींच्या गुंतवणुकीवर ५ हजार लोकांना नोकऱ्या देऊ शकतात. आता, भारत हा जागतिक घडामोडींच्या केंद्रस्थानी आहे आणि सर्व देश भविष्याची शक्ती म्हणून भारताकडे पाहात आहेत. अलीकडच्या वर्षांत भारताची निर्यातही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर भारताला भरपूर संधी उपलब्ध झाल्या आहेत.
‘मिहान-सेझ’मध्ये युनिट स्थापनेची योजना नाही
गौतम सिंघानिया म्हणाले, कंपनीचे विदर्भात अमरावती आणि यवतमाळ येथे दोन प्रकल्प आहेत. अन्य प्रकल्प छिंदवाड्यात आहेत. मिहान - सेझमध्ये युनिट स्थापन करण्याची समूहाची कोणतीही योजना नाही.
भारतातील व्यवसायाची इकोसिस्टिम सर्वोत्तम
जगभरातील उद्योजकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. भारतही त्याला अपवाद नाही. परंतु भारतातील व्यवसायाची इकोसिस्टिम सर्वोत्कृष्ट असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले. कामगार विवादांना सामोरे जाण्यासाठी सरकारने कामगार कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. पत्रपरिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि आ. सुनील केदार उपस्थित होते.
भारत जोडो यात्रेचा मार्ग आधीच ठरलेला होता
कमलनाथ म्हणाले, भारत जोडो यात्रेचा भौगोलिक मार्ग आधीच ठरलेला होता. त्यामुळेच ही यात्रा विदर्भात येऊ शकली नाही. महात्मा गांधींनी अनेक वर्षे मुक्काम केलेल्या सेवाग्रामला भारत जोडो यात्रेने स्पर्श का केला नाही, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, महात्मा गांधी वर्ध्याजवळील या छोट्याशा गावातून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे मार्गदर्शन करत होते. देशात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे महात्मा गांधींनी त्यांच्या कार्याच्या पाऊलखुणा सोडल्या आहेत आणि सेवाग्राम त्यापैकी एक आहे.