लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधीच विकलेल्या जमिनीचा पुन्हा सौदा करून एका तरुणाकडून अडीच लाख रुपये घेणाऱ्या एका वृद्धेसह दोघांविरुद्ध मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.शकुंतलाबाई जयपूरकर (वय ५८) आणि राजेश रामदास टेंभूरकर (वय ५८) अशी आरोपींची नावे आहेत. शकुंतलाबाई नंदनवन झोपडपट्टीत राहते. तर, राजेश झिंगाबाई टाकळीतील आशीर्वाद शाळेजवळ राहतो. कोराडी मार्गावरील केटीपीएस कॉलनीत राहणारे राजेंद्रसिंग राठोड (वय ३३) यांच्यासोबत शकुंतलाबाई आणि राजेश या दोघांनी संगनमत करून मौजा बोरगावमधील शकुंतलाबाई यांच्या मालकीच्या जमिनीचा सौदा पाच लाख रुपयांत केला होता. त्यापैकी अडीच लाख रुपये घेऊन विक्रीचा करारनामा आणि आममुख्त्यारपत्र करून दिले. तर, विक्रीपत्राच्या वेळी अडीच लाख रुपये देण्याचे ठरले. ५ मार्च २००९ ला दुपारी हा व्यवहार झाला. त्यानंतर राठोड विक्री करून घेण्याच्या तयारीला लागले. त्यांनी संबंधित जमिनीची कागदपत्रे गोळा केली असता ही जमिनी शकुंतलाबाईने २००६ मध्येच डोमा सोनबा जयपूरकर (वय ७०, रा. बोरगाव बुद्रूक, ता. कळमेश्वर) यांना विकल्याचे उघड झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने राठोड यांनी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी शकुंतलाबाई आणि राजेश या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.