संदीप सहारे यांच्या नेतृत्वात निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंबाझरी उद्यान परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृती भवन तोडण्यात आले आहे. ते पुन्हा उभारण्यात यावे, यासाठी शुक्रवारी संदीप सहारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली. तसेच मनपा आयुक्तांना निवेदन देऊन सभागृहात याबाबतचा ठराव पारित करण्याची मागणी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षा घेतली. दोन महिन्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अंबाझरी परिसरात स्मृती सांस्कृतिक भवन उभारण्यात आले होते. उद्यान व भवनाच्या देखभालीवर मनपा प्रशासनाने आजवर १०० कोटी खर्च केले.
अंबाझरी उद्यान महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला विकासाच्या नावाखाली स्मृती भवन तोडले. भवन तोडणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संदीप सहारे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
आंदोलनात संदीप सहारे यांच्यासह मनोज सांगोळे, त्रिशर सहारे, मिलिंद सोनटक्के, भावना लोणारे, उज्ज्वला बनकर, पवन सोमकुंवर, अमोल लोंढे, पीयूष लाडे, आशितोष कांबळे, विक्रांत खडाळे, सत्येंद्र सिंह, वसंतराव बनकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.