नागपूर : गांधीबाग येथील सोक्ता भवन जागेवर मनपाची १४ मजली व्यावसायिक संकुल बांधण्याची योजना आहे. हे प्रस्तावित संकुल दाट झाडे तोडून उभारू नये. या प्रकल्पाचे पुनर्मूल्यांकन करण्यात यावे, अशी विदर्भ टॅक्सपेयर्स असोसिएशनची (व्हीटीए) मागणी आहे.
व्हीटीएने कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हा मुद्दा जनहितार्थ उचलला. व्हीटीएचे अध्यक्ष श्रवणकुमार मालू म्हणाले, सोक्ता भवन २९,३५० चौरस मीटर जागेवर असून नैऋत्येला ६,३५० चौरस मीटर जागेेवर व्यावसायिक संकुल बांधण्याची मनपाची योजना आहे. या भागात दाट झाडे आहेत. व्हीटीएचे उपाध्यक्ष हेमंत त्रिवेदी म्हणाले, मध्य नागपुरात नागरिकांसाठी एकमेव बाग आहे. मॉर्निंग वॉक आणि योगप्रेमी या बागेचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.
व्हीटीएचे सचिव तेजिंदरसिंग रेणू म्हणाले, बगडगंज परिसरात अपूर्ण असलेला हरिहर मंदिर मॉलसारखाच हा प्रकल्पही खोळंबण्याची भीती आहे. केवळ तळमजला आणि पहिल्या मजल्याला व्यावसायिक स्वरूप येईल आणि वरचे मजले रिक्त राहतील. या प्रकल्पामुळे करदात्यांचेच नुकसान होईल आणि मध्य नागपुरातील मौल्यवान हिरवे कवचदेखील गमावले जाईल. त्यामुळे व्यावसायिक संकुल गांधीबाग येथील जीर्ण झालेल्या पोलिस क्वॉटर्सला लागून असलेल्या पर्यायी जागेवर बांधावे. सोक्ता भवनच्या जागी थोड्याशा जागेवर पार्किंग प्लाझा प्लाझा बांधता येऊ शकतो. बाजार सर्वेक्षणासह वास्तववादी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी व्हीटीएकडून मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांना पत्र पाठविण्यात येणार आहे.
बैठकीला माजी अध्यक्ष जे.पी. शर्मा, उपाध्यक्ष हेमंत त्रिवेदी, कोषाध्यक्ष पवन के. चोप्रा, सहसचिव अमरजित सिंग चावला व राजेश कानूनगो, साकिब पारेख, गोविंद पटेल, सीए संदीप अग्रवाल, वीरू बलानी, हेमंत शर्मा, प्रतिश गुजराथी, श्रीकांत ओक आणि नरेंद्रपाल सिंग ओसन उपस्थित होते.