लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु तांत्रिक अडचणींमुळे आठ अभ्यासक्रमांतील विविध विषयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील सुधारित वेळापत्रकदेखील विद्यापीठाने जारी केले आहे.
बी.ई., बी.ए.. बी.कॉम. चतुर्थ सत्रासह विविध अभ्यासक्रमांतील काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडथळ्यांचा फटका बसला होता. अनेकांना पेपर देता आले नाहीत, तर काही जणांचे पेपर आपोआप सबमिट झाले. यानुसार २४ जुलै ते १७ ऑगस्ट या कालावधीत विविध विषयांच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या. यात बी.ए.. बी.कॉम., बी.ए. (आर.एस.), बी.एफ.ए., बी.एस.डब्लू., बीसीसीए, बीबीए, बीई, बी.टेक., बी.आर्क., बी.फार्म. या अभ्यासक्रमांच्या चौथ्या सत्राच्या परीक्षांचा समावेश होता. मात्र तांत्रिक अडथळ्यांमुळे काही दिवसांअगोदर घोषित करण्यात आलेल्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाने संकेतस्थळावर जारी केले आहे.
परीक्षा - फेरपरीक्षेचा जुना दिनांक - सुधारित दिनांक
बी.कॉम., बीबीए, बीसीसीए (चतुर्थ सत्र) : १६ ऑगस्ट - २९ ऑगस्ट
बी.ए. (चतुर्थ सत्र) - १६ व १७ ऑगस्ट - २९ व ३० ऑगस्ट
बी.ए. (आर.एस.), बी.एफ.ए., बी.एस.डब्ल्यू. (चतुर्थ सत्र) - १६ व १७ ऑगस्ट - २९ ऑगस्ट
बी.ई.(चतुर्थ सत्र) - १६ ऑगस्ट - २९ ऑगस्ट
बी.टेक., बी.आर्क. (चतुर्थ सत्र) - १६ ऑगस्ट - १९ ऑगस्ट
बी.फार्म. (चतुर्थ सत्र) - १६ ऑगस्ट - १९ ऑगस्ट