नागपूर : सरकारी मालमत्ता, कंपन्या व वित्तीय संस्थांमध्ये या देशातील जनतेचा घामाचा पैसा लागला आहे. मात्र, या मालमत्ता अद्योगपती गौतम अदानी यांना सोपविण्याचा धडाका सुरू आहे. केंद्रात पुन्हा काँग्रेसचे सरकार आल्यास या सर्व मालमत्तांच्या हस्तांतरणाची चौकशी केली जाईल. नियम, कायदे तोडून सरकारी मालमत्ता दिल्याचे आढळून आले तर त्या मालमत्तांचे राष्ट्रीयीकरण केले जाईल, असा इशारा अ. भा. काँग्रेसचे महासचिव व प्रवक्ते मोहन प्रकाश यांनी दिला.
नागपुरात शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना मोहन प्रकाश म्हणाले की, केंद्र सरकारची धोरणे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (आरएसएस) नव्हे, तर उद्योगपती गौतम अदानी यांच्याकडून आखली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याची अंमलबजावणी करीत असून, सरसंघचालक मोहन भागवत हे त्यांना प्रमाणपत्र देण्याचे काम करीत आहेत, अशी टीका त्यांनी केली. पंतप्रधान हे विविध देशांत जाऊन अदानींच्या व्यावसायिक हितासाठी काम करीत आहेत. उद्योगपती अदानींना कर्ज देऊन देशातील बँकांचे आर्थिक स्वास्थ्य खराब केले जात आहे. सरकारी मालमत्तेची लूट सुरू आहे. ४१ ऑर्डनन्स फॅक्टरींचे खासगीकरण केले जात आहे. हीच तुमची राष्ट्रभक्ती आहे का, याचे उत्तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी माजी मंत्री नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, आ. विकास ठाकरे, विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते.