नागपूर : झाडे आणि पर्यावरणाच्या संवर्धनापेक्षा जाहिरातीतून पैसा मिळविणे महानगरपालिकेसाठी महत्त्वाचे झाले, असे वाटायला लागले आहे. रस्त्यावर लागलेल्या हाेर्डिंगवरील जाहिराती दिसाव्या म्हणून एकापाठाेपाठ एक झाडांचे बळी घेतले जात आहेत आणि मनपाच्या उद्यान विभाग आणि जाहिरात विभागाच्या डाेळ्यावर जणू पडदा पडला आहे. वर्दळीच्या रविनगर आणि शताब्दी चाैकात नव्याने झाडांची कत्तल झाली तरी कुठेही हाकबाेंब नाही.
रविनगर चाैकात मंगळवारी रात्री काही लाेकांनी १५ वर्षे वय असलेले वडाचे झाड बुडासकट कापले. हेतू एवढाच की हिरव्या पानांनी झाकलेली हाेर्डिंगवरील जाहिरात लाेकांना दिसावी. वास्तविक त्या भागातून फांद्या कापता आल्या असत्या पण वारंवारची खटखट काेण करणार म्हणून समाजकंटकांनी थेट बुडासकट झाडच ताेडून टाकले.
दुसरी घटना शताब्दी चाैकात घडली. या चाैकात उभे असलेले माेठे झाड काही दिवसांपूर्वी कुऱ्हाडीने कापून टाकण्यात आले. उद्देश ताेच हाेता, जाहिरातीचे हाेर्डिंग दिसावे. ही झाडे का कापण्यात आली, याची साधी चाैकशीही मनपाच्या जबाबदार विभागांनी दाेषींना केली नाही. काही पर्यावरणप्रेमींनी तक्रारी देऊनही कारवाईसाठी हालचाली करण्याची साधी तसदीही विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली नाही.
काही दिवसांपूर्वी एका पक्षाच्या नेत्याने दुर्गात्सव मंडळाच्या मंडपाला सजविता येत नाही म्हणून तेथील झाड बुडासकट साेलून काढले. शहराचे पर्यावरण खड्ड्यात गेले तरी चालेल पण आम्हाला देणेघेणे नाही, अशीच बेजबाबदार वागणूक नेते, जाहिरातदार व प्रशासनाकडून हाेत असेल तर भविष्यात शहराच्या पर्यावरणाचे काही खरे नाही, अशी खंत पर्यावरणवाद्यांकडून व्यक्त हाेत आहे.