लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्यांकासाठीच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून अल्पसंख्यांक नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहचवावा, असे आवाहन अल्पसंख्यांक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी केले.विभागीय आयुक्त कार्यालयात अल्पसंख्यांक विभागाच्या विविध योजनांच्या प्रगतीची नागपूर विभागातील जिल्ह्यांची विभागीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत उपायुक्त सुधाकर तेलंग, उपायुक्त संजय धीवरे, भंडारा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी आदी उपस्थित होते.केंद्र व राज्य शासनाने अधिसूचित केल्याप्रमाणे धार्मिक अल्पसंख्यांकांमध्ये मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी व ज्यू धर्मांचा समावेश होत असल्याचे सांगून श्याम तागडे म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्याकांसाठी विविध योजना आहेत. या योजना महत्त्वाच्या असून, त्यांच्या अंमलबजावणीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्याला अल्पसंख्यांक विकास योजनांचा निधी देण्यात आलेला आहे. मंत्रालयस्तरावर नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमधून प्राप्त झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यांचा निधी लवकरच जिल्ह्यांना प्राप्त होईल. जे प्रस्ताव अद्यापपर्यंत मंत्रालयात पाठविण्यात आलेले नाहीत, त्यांना तात्काळ प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून मंत्रालयात पाठविण्यात यावे, असे आवाहन तागडे यांनी यावेळी केले.अल्पसंख्यांक विभागाच्या योजनांची अंमलबजावणी योग्यरीत्या करण्यासाठी तसेच योजनांचा निधी खर्च करण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर योजनांच्या अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे, लवकरच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी चमूकडून पूर्ण झालेल्या योजनांची पाहणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी बैठकीत जिल्ह्यातील धर्मनिहाय, अल्पसंख्यांकनिहाय लोकसंख्या, शिष्यवृत्ती योजना (केंद्रीय व राज्यस्तरीय), डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या ७० टक्के संख्या असलेल्या शाळांना पायाभूत सुविधा पुरविणे, वसतिगृह योजना, मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग योजना, ग्रामीण क्षेत्र विकास योजना, शहरी क्षेत्र विकास योजना, मौलाना आझाद शिकवणी व संबंध योजना, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना यासह विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. बैठकीला नागपूर विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अल्पसंख्यांक नागरिकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहचवा : प्रधान सचिव श्याम तागडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 9:50 PM
केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्यांकासाठीच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून अल्पसंख्यांक नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहचवावा, असे आवाहन अल्पसंख्यांक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी केले.
ठळक मुद्देअल्पसंख्याकांच्या विविध योजनांचा आढावा