लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वकिली व्यवसायात यशाचे शिखर गाठण्यासाठी अथक परिश्रम घेणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी बुधवारी नवोदित वकिलांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या वतीने स्टडी सर्कल उपक्रमांतर्गत न्या. देव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ‘नवोदित वकिलांनी काय करावे व काय करू नये आणि नवोदित वकिलांकडून न्यायालयाला असलेल्या अपेक्षा’ हा व्याख्यानाचा विषय होता. सुरुवातीचे अडथळे पार करून यशाचे शिखर गाठण्यापर्यंत प्रवास अतिशय सुंदर असतो. परंतु, ही अनुभूती प्रत्येकाला मिळत नाही. त्यासाठी लक्ष्य ठरवून कृती करावी लागते. तसेच, वकिलामध्ये जिद्द, परिश्रम व समर्पण भावना आवश्यक असते. प्रत्येक न्यायमूर्ती वकिलांच्या विकासाचा विचार करीत असतात. त्यांना शिकण्याची संधी देत असतात. वकिलांनी त्या संधीचे सोने करायला हवे, असे न्या. देव यांनी सांगितले.वकिलांनी पक्षकार, न्यायमूर्ती व न्यायदान व्यवस्थेसोबत नेहमी प्रामाणिक असायला हवे. ज्ञानार्जन व संशोधनाकरिता त्यांनी केवळ संगणकावर अवलंबून राहू नये. कायद्याची पुस्तके व कॉमेंट्रीचा सखोल अभ्यास करावा, असेही न्या. देव यांनी सांगितले. हे व्याख्यान उच्च न्यायालयाच्या सभागृहात झाले. संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांनी न्या. देव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपाध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम पाटील यांनी प्रास्ताविक केले तर, अॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी आभार मानले.