नागपूर : म्युकरमायकोसिसवर प्रभावी असलेले ‘अॅम्फोटेरिसिन बी लायपोसोमल’ या इंजेक्शनमुळे मेडिकलमधील रुग्णांना ‘रिअॅक्शन’ आली आहे. मेडिकल प्रशासनाने या इंजेक्शनच्या वापरावर बंदी आणली आहे. विशेष म्हणजे, औरंगाबाद येथील मेडिकलमध्येही असाच प्रकार घडल्याने त्या ‘बॅच’च्याही इंजेक्शनवर बंदी आणली आहे.
प्राप्त माहितीनुसार, २३ जून रोजी ‘एलबीडी १४८’ या बॅच क्रमांकाचे ‘लायका लॅबोटरीज्’चे ‘अॅम्फोटेरिसिन बी’चा मोठा साठा मेडिकलला मिळाला. परंतु इंजेक्शन दिल्यानंतर रुग्णांना थंडी वाजून ताप, मळमळणे आदी लक्षणे दिसून आलीत. २५ तारखेला पुन्हा याच इंजेक्शनचा नवा स्टॉक आला असतानाही रुग्णांना तीच लक्षणे दिसून येताच मेडिकल प्रशासनाने २६ तारखेला इंजेक्शन वापरावर बंदी आणली.