नागपूर : समाज परिवर्तनाचा झेंडा खांद्यावर घेत नागपूर, महाराष्ट्र व संपूर्ण देशात जनसामान्यांचा आवाज बुलंद करणाऱ्या ‘लाेकमत’चा ५१वा वर्धापन दिन गुरुवारी सामान्य वाचक, तसेच सामाजिक, राजकीय, चळवळीच्या कार्यकर्त्यांनी परिवर्तनाचे ५१ दिवे पेटवून अनाेख्या पद्धतीने साजरा केला.
स्वातंत्र्य संग्राम सैनिक आणि ‘लाेकमत’चे संस्थापक ‘बाबूजी’ उपाख्य जवाहरलालजी दर्डा यांनी १५ डिसेंबर १९७१ राेजी लावलेले हे राेपटे फुलले, बहरले, विस्तारले, जनामनात रुजले. ५१व्या वर्धापन दिनाला यंदा बाबूजींच्या जन्मशताब्दीचे औचित्य आहे. सामाजिक भान व बांधिलकी हा ‘लोकमत’ने अर्धशतकाहून अधिक काळ जोपासलेला वसा असल्याने युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना भेडसावणाऱ्या सुरक्षा, शिक्षण, आराेग्य, बेराेजगारी, नागरी समस्या, पर्यावरण आदी क्षेत्रांतील परिवर्तनाचे दीप वर्धा राेडस्थिती लाेकमत भवनासमाेर प्रज्वलित करण्यात आले.
‘लाेकमत’च्या एडिटाेरियल बाेर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांच्या प्रेरणादायी उपस्थितीत हा शानदार साेहळा पार पडला. प्रारंभी ‘लाेकमत’ परिवाराचे ज्येष्ठ सदस्य, माजी संपादक कमलाकर धारप यांच्या हस्ते केक कापण्यात आला. रंगीबेरंगी बलून्स, ५१व्या वर्धापन दिनाच्या रांगाेळीने सजलेल्या परिसरात ‘लाेकमत’च्या सर्व विभागांचे विभागप्रमुख, कर्मचारी, सहकारी व नागपूरकर नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
यादरम्यान, नागपूरसह विविध ठिकाणांहून आलेल्या सामान्य वाचकांनी त्यांचे प्रश्न व त्यावरील उपाय ‘लोकमत’कडे सोपविले.
सामान्य वाचक हीच ‘लाेकमत’ची ताकद : विजय दर्डा
- सुवर्ण महाेत्सवी वाटचालीत ‘लाेकमत’ने माेठे यश संपादित केले. मात्र, हे यश सहज मिळालेले नाही. अगदी सुरुवातीपासून काम करणारे समर्पित सहकारी, कर्मचारी यांनी रात्रंदिवस मेहनत करून ‘लाेकमत’ला इथपर्यंत आणले. या यशात सर्वात माेठा वाटा सामान्य वाचकांचा आहे. वाचक हीच ‘लाेकमत’ची ताकद आहे, अशी कृतज्ञ भावना ‘लाेकमत’ एडिटाेरियल बाेर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केली.