जिल्ह्यात १६,६३२ बेड, ऑक्सिजन असलेले ९९४४, आयसीयू २८०८, तर व्हेंटिलेटर बेड ९९६
दररोज घेतला जातोय आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी येत आहे. परंतु, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने प्रशासनही गाफील नाही. त्यांनी याच्या नियंत्रणाची पूर्ण तयारी केली आहे. याअंतर्गत सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेडची संख्या तीन पटीने वाढविण्यात आली आहे.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या नेतृत्वात संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे. दररोज प्रत्येक गोष्टीचा आढावा घेतला जात आहे. रुग्णालयात कोविड बेड व ऑक्सिजन पुरवठा वाढविण्याला सुरुवात झाली. अधिकाअधिक खासगी रुग्णालयात कोविड रुग्णासाठी बेड आरक्षित करण्यात आले.
बॉक्स
ऑक्सिजन
नागपुरात गेल्या १ मे पासून सलग १०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. यासोबतच ७० मेट्रिक टन ऑक्सिजन नागपुरातच उपलब्ध होत आहे. याशिवाय २२ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरला ऑक्सिजनची कमतरता आता भासणार नाही.
बॉक्स
ऑक्सिजन बेड
नागपुरात ऑक्सिजन नसलेले बेड १६६३२ आहेत. ऑक्सिजन असलेले ९९४४, तर आयसीयू २८०८, तर व्हेंटिलेटर बेड ९९६ आहेत. यासोबतच शहरात विविध भागात सामाजिक संघटनांतर्फेही अनेक ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले असून, त्यांच्याकडेही बेड उपलब्ध आहेत.
कोविड केअर सेंटर
नागपुरात पहिल्या लाटेत मनपा सोबत ६६ खासगी रुग्णालये होती. मार्च अखेरपर्यंत ८८ होती यात वाढ करून एप्रिलमध्ये १०८ पर्यंत नेली आणि एप्रिलअखेरपर्यंत १४६ कोविड रुग्णालये शहरी भागात आहेत, तर ग्रामीण २२ कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत.
औषधी
कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या औषधीची कमतरता भासू नये, यासाठी प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. मध्यंतरी रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने काळाबाजार वाढला होता. त्यानंतर रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठाही सलगपणे व्यवस्थित होत आहे.
जंबो हॉस्पिटल
मेये, मेडिकल या शहरातील दोन मोठ्या रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. यासोबतच प्रत्येक तालुकास्तरावरील रुग्णालयांमध्ये बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. याशिवाय मानकापूर क्रीडा संकुल येथे जंबो हॉस्पिटल उभारण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याची तयारीही सुरू आहे.
प्रशासन पूर्णपणे तयार
सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत कमतरता येत आहे. मात्र, कोरोनाची तिसरी लाट येईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन पूर्णपणे तयार आहे. बेडची संख्या तिपटीने वाढविण्यात आली आहे ऑक्सिजनचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे. कोविड केअर सेंटरही वाढविले आहे. प्रत्येक गोष्टीवर प्रशासनाची नजर आहे. दररोज आढावा घेतला जात आहे.
अविनाश कातडे,
निवासी उपजिल्हाधिकारी, नागपूर.