लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेगळे विदर्भ राज्य झाल्याशिवाय विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या सुटू शकणार नाहीत. तेलंगणाच्या धर्तीवर विदर्भातील शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज उपलब्ध करून द्यावी. शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू करावा, असे सूतोवाच करीत स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आणि शेतकरी हितासाठी आमदारकीचा राजीनामा देईल, असा खणखणीत इशारा काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख यांनी दिला. सोबतच वेगळ्या विदर्भाच्या नावाने स्वतंत्र आघाडी करण्यास तयार असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार, असेही त्यांनी सांगितले.काटोलच्या नगर भवन येथे बुधवारी (दि. ३) आयोजित स्नेहमीलन कार्यक्रमात ते बोलत होते. विदर्भ राज्याची निर्मिती ही काळाची गरज असून विदर्भ राज्य झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे सांगत आ. देशमुख म्हणाले, विदर्भात तयार झालेल्या विजेने मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्टत झगमगाट होतो. परंतु त्याच विदर्भातील शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळत नाही, हा कुठला न्याय आहे. काही वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या तेलंगण शासनाने सर्व शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज देण्याची घोषणा केली. त्यामुळे तेथील शेतकरी सुजलाम सुफलाम होईल, बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे.त्याविरुद्ध आपल्या विदर्भात स्थिती आहे. मुबलक उद्योगधंदे नसल्याने कित्येक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. विदर्भातील युवक गुन्हेगारीकडे वळत आहे. हे चित्र बदलण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य होणे गरजेचे आहे, असे मत आ. देशमुख यांनी याप्रसंगी व्यक्त केले.शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू करावा, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पुरुषोत्तम धोटे, पंचायत समिती सभापती संदीप सरोदे, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष भीमराव बन्सोड, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख, डॉ. प्रेरणा बारोकर, उपसभापती योगेश चाफले, पीरिपाचे जिल्हाध्यक्ष गोपीचंद ढोके, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत मानकर, राष्टवादीचे अंगद भैस्वार, दिनकर राऊत, विदर्भ माझा पक्षाचे समीर उमप, भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप ठाकरे, शहराध्यक्ष मारोतराव बोरकर, राजू सरोदे, नगरसेवक संदीप वंजारी, दिनेश निंबाळकर, सोपान हजारे आदी उपस्थित होते.प्रास्ताविक संदीप सरोदे यांनी केले. संचालन विजय महाजन यांनी केले. दिलीप तिजारे यांनी आभार मानले.
- तर मी बंडखोर!भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात विदर्भ राज्य वेगळे करू असे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुकीत भाजपला यश मिळून केंद्र आणि राज्यात सत्ता प्राप्त करूनही स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबत काहीच हालचाली करण्यात आलेल्या नाहीत. निवडणूक काळात मतदारांना मीसुद्धा काही आश्वासने दिली होती. त्याची पूर्तता करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून विदर्भ राज्याची निर्मिती, शेतमालाला योग्य भाव आदी मुद्दे उपस्थित केले. या मुद्यांमुळे मी बंडखोर ठरत असेल तर तेसुद्धा मला मान्य आहे. मात्र विदर्भ राज्य झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे आ. देशमुख यांनी सांगितले.