योगेश पांडे
नागपूर : ‘डीआरडीओ’ची ओळख ही ‘डिफेन्स’ क्षेत्रातील तंत्रज्ञान बनविणारी संस्था अशीच असली तरी तेथील वैज्ञानिकांनी एक अनोखा प्रयोग राबवून तो प्रत्यक्षात आणला आहे. सीमेवरील सैनिक, अंतराळात जाणारे ॲस्ट्रोनॉट्स यांनादेखील घरी बनणारे काही विशिष्ट पदार्थ खायची इच्छा असते. मात्र, ते शक्य होत नाही. त्यांचा विचार करून ‘डीआरडीओ’ने ‘रेडी टू इट’ पदार्थच विकसित केले आहेत. यात अगदी ‘व्हेज बिर्याणी’, ‘हलवा’ अन ‘एनर्जी बार’ यांचादेखील समावेश आहे.
१०८ व्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’मध्ये ‘डीआरडीओ’च्या ‘डिफेन्स फूड रिसर्च लेबॉरेटरी’कडून त्यांच्या प्रयोग व उपकरणांची विशेष प्रदर्शनी लावण्यात आली आहे. त्यात ‘रेडी टू इट’ पदार्थदेखील ठेवण्यात आले आहेत. सैन्यातील अनेक जवानांना दुर्गम भागात अनेक दिवस काढावे लागतात. शिवाय ‘ऑपरेशन्स’साठी गेल्यावर बरेच दिवस मिळेल ते खाऊन काढावे लागतात. त्यांची अडचण लक्षात घेता ‘डीआरडीओ’तर्फे अतिशय कमी वजनाचे ‘रेडी टू इट’ पदार्थ विकसित करण्यात आले आहेत. वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत हे पदार्थ विकसित केले आहे. पदार्थांना नैसर्गिक चव मिळेल व त्यातून सैनिकांना आवश्यक ती अन्नपदार्थांची तत्वे मिळतील याचीदेखील खबरदारी बाळगण्यात आली आहे. ‘डीआरडीओ’तर्फे त्याला ‘एमआरई रेशन’ (मिल्स रेडी टू इट) असे नाव देण्यात आले आहे. हे पदार्थ एका वर्षापर्यंतदेखील टिकू शकतात, अशी माहिती ‘डीआरडीओ’च्या वैज्ञानिकांनी दिली.
‘आर्मी’सोबतच ‘नेव्ही’साठीदेखील फायदेशीर
संबंधित पदार्थ हे केवळ ‘आर्मी’तील जवानच नव्हे तर नौदलातील जवानांसाठीदेखील अतिशय फायदेशीर आहे. या जवानांना युद्धवाहू नौकेवर सर्व रेशन नेण्याऐवजी हे ‘पॅकेट्स’देखील नेता येतील व त्यामुळे जहाजावरील वजन निश्चित कमी होऊ शकेल.
‘रोटॉर्ट’ तंत्रज्ञानाचा उपयोग
हे पदार्थ बनविताना वैज्ञानिक प्रक्रियेचा उपयोग करण्यात आला आहे. यात थर्मल प्रोसेसिंग करण्यात येते व अन्नपदार्थांतील सर्व द्रव्य शोषून घेण्यात येते. यासाठी पदार्थ्यांवर ११४ ते ११८ अंश सेल्सिअस तापमानावर प्रक्रिया करण्यात येते. ज्या ‘एन्झाईम्स’मुळे अन्नपदार्थ खराब होऊ शकतात, त्यांना या प्रक्रियेत संपविण्यात येते. याला ‘रेटॉर्ट’ तंत्रज्ञान असे म्हणतात. ‘डीआरडीओ’ने या तंत्रज्ञानाचा उपयोग करत ‘बिर्याणी’, ‘हलवा’, ‘एनर्जी बार’, ‘आम बार’, ‘वरण भात’, ‘पायनॅपल ज्यूस पावडर’, ‘न्युट्री फूड बार’, ‘व्हेज पुलाव’, ‘दाल खिचडी’ इत्यादी पदार्थ तयार केले आहेत.
अंतराळात दोन मिनिटांत पदार्थ तयार
अंतराळात पाण्याचा उपयोग करताना अनेकदा अडचणी येतात. ‘स्पेस फूड’मधील पदार्थ पॅकेटसह एका विशिष्ट प्रकारच्या वॉर्मरमध्ये टाकावे लागतात. दोन मिनिटांत ते पदार्थ खाण्यायोग्य होतात.
प्रदेशांनुसार पदार्थांची निर्मिती
‘डीआरडीओ’ने सैन्यदलासाठी त्यांच्या तैनातीचे प्रदेश लक्षात घेऊन ‘एमआरई रेशन’ची निर्मिती केली आहे. वाळवंट, बर्फाळ प्रदेश, नौदल, कमांडो असे विविध गटांनुसार पदार्थ तयार करण्यात आले आहेत. ‘एमआरई’च्या एका बॉक्समधून एका सैनिकाचे एका दिवसाचे जेवण होऊ शकते.