लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वडिलोपार्जित मालमत्तेसाठी सुरू असलेल्या कौटुंबिक वादानंतर एका नराधमाने आधी स्वत:च्या वृद्ध आईला मारहाण केली आणि नंतर जाब विचारणाऱ्या सख्ख्या लहान भावाला पहिल्या मजल्यावरून धक्का मारून खाली पाडले. यात अनिल माणिकराव भांगे (वय ४८) गंभीर जखमी झाले. सख्खा भाऊ पक्का वैरी झालेली ही घटना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री घडली.संदीप माणिकराव भांगे (वय ५२) असे आरोपीचे नाव आहे. तो बोदड ले-आऊटमधील साईनगरात राहतो. आरोपी संदीप, अनिल आणि आनंद भांगे तसेच अन्य एक असे एकूण चार भाऊ आहेत. संदीपने चार महिन्यांपासून मालमत्तेसाठी कुरबूर सुरू केली असून, तो अधूनमधून कुटुंबीयांसोबत भांडणही करतो. आनंद भांगेचे निवासस्थान बापूनगर(मानकापूर)मध्ये आहे. आनंद यांची पत्नी वैशाली आणि आई यमुना भांगे (वय ७०) या सोमवारी रात्री ८ च्या सुमारास घरी असताना आरोपी संदीप तेथे आला. त्याने वैशाली आणि आई यमुनाबाईंसोबत वाद घालणे सुरू केले. एवढेच नव्हे तर आपल्या वृद्ध आईला मारहाणही केली. वैशाली यांनी भासऱ्याला कसेबसे आवरून सासूची सोडवणूक केली आणि दुसरे भासरे अनिल यांना फोन करून घरी बोलवून घेतले. आईला मारहाण झाल्याचे ऐकून अनिल लगबगीने तेथे पोहचले. त्यांनी मोठा भाऊ आरोपी संदीपची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तो ऐकत नसल्याचे पाहून ते पोलिसांना बोलवतो म्हणत पहिल्या माळ्याच्या गॅलरीत उभे झाले. ते मोबाईलवरून संपर्क करीत असतानाच मागून आलेल्या आरोपी संदीपने अनिल यांना मागून धक्का देऊन इमारतीच्या खाली पाडले. या प्रकारामुळे भांगे कुटुंबीयच नव्हे तर आजूबाजूची मंडळीही स्तब्ध झाली. त्यांनी गंभीर जखमी झालेल्या अनिलला मानकापुर येथील खासगी इस्पितळात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, वैशालीच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपी संदीप भांगेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.उच्चशिक्षित मात्र हेकेखोर !आरोपी संदीप उच्चशिक्षित आहे. त्याने एमए बीएड, एमफिल असे शिक्षण घेतले आहे. तर, त्याचे तिन्ही भाऊ नोकरदार आहे. सर्व वेगवेगळे राहतात. आरोपीच्या विचित्र स्वभावामुळे त्याला नोकरी सोडावी लागली. त्यानंतर तो त्याच्या वडिलोपार्जित घराची संपूर्ण मालकी मिळावी म्हणून आईला छळू लागला. त्याच्या त्रासाला कंटाळून आईने वडिलोपार्जित घर विकून सर्व मुलांना समान रक्कम देण्याचा निर्णय घेतला. ते मान्य न करता संदीपने घराचा संपूर्ण हिस्सा आपल्याला मिळावा, असा हेका धरला आहे. सोमवारी रात्री घडलेली घटना अशाच हेकेखोरीतून घडल्याचे पोलीस सांगतात. एवढा मोठा गुन्हा केल्यानंतरही आरोपीला पश्चात्ताप नाही. जीवनात अशा घडामोडी घडतच राहतात, असे तो पोलिसांकडे म्हणतो आहे.