नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर रिअल इस्टेट क्षेत्रात उत्साहाचे वातावरण असून, लोकांची घरखरेदीसाठी बिल्डरांकडे विचारणा होत असून अनेक ग्राहक बुकिंगही करीत आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊननंतर नवीन प्रकल्प सुरू न करता जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर बिल्डरांचा भर होता; पण आता मागणी वाढल्याने अनेकजण नवीन प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत आहे. बँकांचे कमी व्याजदर आणि केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेमुळे मध्यमवर्गीयांकडून घरांची मागणी वाढल्याने रिअल इस्टेट बाजार जोरात तर घरविक्रीच्या श्रावणसरी बरसत आहेत.
सध्या २५ ते ५० लाखांपर्यंतच्या फ्लॅटला मागणी आहे. ४० ते ५० हजार उत्पन्न गटातील लोक घरखरेदीसाठी पुढे येत आहेत. दुसरीकडे, बांधकाम साहित्याच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याने बिल्डरांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. नवीन प्रकल्पात घराच्या किमती २५० ते ४०० रुपये चौरस फुटाने वाढणार आहेत. सध्या जुन्या प्रकल्पातील घरे पूर्वीच्याच किमतीत विक्रीचा सपाटा बिल्डरांनी लावला आहे. गेल्या वर्षी कोरोनाकाळात बांधकाम क्षेत्रात मंदीचे वातावरण आल्यानंतर राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात तीन टक्क्यांपर्यंत कपात केली होती. त्याचा फायदा ग्राहकांसोबत बिल्डरांनाही झाला. घरांची विक्री वाढल्याने बिल्डरांचा उत्साह वाढला. या वर्षीही मुद्रांक शुल्कात कपात करण्याची बिल्डरांची राज्य सरकारकडे मागणी आहे. या संदर्भात निवेदन महाराष्ट्र क्रेडाई मेट्रोने मुख्यमंत्र्यांना दिले आहे. राज्य सरकारने योग्य निर्णय घेतल्यास बांधकाम क्षेत्रात आणखी उत्साह संचारणार असल्याचे बिल्डर्स म्हणाले.
मुद्रांक शुल्क कपातीमुळे गेल्या वर्षीच्या आर्थिक वर्षात जानेवारी महिन्यात सर्वाधिक रजिस्ट्री झाल्या. मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मार्चमध्ये ५३३० आणि एप्रिल महिन्यात ५३०० रजिस्ट्री झाल्या. मुद्रांक शुल्ककपातीचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी मार्च महिन्यात खरेदी केलेल्या मुद्रांकाचा फायदा अनेकांनी जूनपर्यंत घेतला. त्यामुळे जून महिन्यात सर्वाधिक ८७२१ रजिस्ट्री झाल्याची नागपूर शहर कार्यालयात नोंद आहे. नवीन आर्थिक वर्षात एप्रिल ते जुलैपर्यंत नागपूर शहर कार्यालयाला मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून १६६.६२ कोटींचा महसूल प्राप्त झाला.
कोणत्या महिन्यात किती रजिस्ट्री?
जानेवारी ६९४५
फेब्रुवारी ६४४३
मार्च ५३३०
एप्रिल ५३००
मे ३७५९
जून ८७२१
जुलै ७२४८
दररोज १७६ ते २९० पर्यंत रजिस्ट्री
नागपूर शहर रजिस्ट्री कार्यालयातील रजिस्ट्रीची आकडेवारी पाहिल्यास दररोज १७६ ते २९० दरम्यान रजिस्ट्री झाल्याची नोंद आहे. राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात पुन्हा कपात केल्यास पुढे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
गुंतवणूक म्हणून घर घेणारेच अधिक
पूर्वी आणि आताही गुंतवणूक म्हणून घर घेणारेच अधिक आहेत. घराच्या वाढत्या किमती लक्षात घेता पहिल्यांदा घर घेणाऱ्यांपेक्षा गुंतवणूकदार घरासाठी जास्त विचारणा करीत आहे. यामध्ये ४० ते ५० लाखांदरम्यान, एक कोटीपर्यंत आणि त्यापेक्षा जास्त किमतीचे प्रीमिअम घर घेणारे जास्त आहेत. गुंतवणुकीदारांमुळेच बांधकाम क्षेत्रात उत्साह आला आहे. बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्यानंतरही बिल्डर जुन्याच किमतीत घरांची विक्री करीत असल्याने गुंतवणूकदार पुढे येत आहेत.
म्हणून वाढल्या घराच्या किमती :
प्लॉट : जमिनीच्या किमती वाढल्याने फ्लॅटची किंमतही वाढली आहे.
सिमेंट : केवळ सहा महिन्यांत सिमेंटची किंमत ४० टक्क्यांनी वाढली आहे.
स्टील : स्टीलच्या किमतीत ४० टक्क्यांची वाढ झाली आहे.
वीट : कच्च्या साहित्यामुळे विटांची किंमत एक रुपयाने वाढली आहे.
वाळू : नदीघाटांचा लिलाव न झाल्याने वाळूची किंमत वाढली आहे.
घर घेणे सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर
बँकांचे व्याजदर आणि पंतप्रधान आवास योजनेचा फायदा मिळत असला तरीही कोरोनामुळे मध्यमवर्गीयांचे उत्पन्न कमी झाल्याने अजूनही घर खरेदी करणे त्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. बँकांचे हप्ते फेडण्याऐवजी लोक बचतीकडे जास्त वळले आहेत. जास्त उत्पन्नगटातील लोक खरेदीसाठी पुढे येत आहेत.
श्रीराम हातागडे, खरेदीदार.
बँकेत बचत असावी, याकडे लोकांचे जास्त लक्ष आहे. हप्ते फेडू न शकणारे अनेकजण घर खरेदी करण्याऐवजी पैशांच्या संचयावर जास्त लक्ष देत आहेत. खासगी कंपनीत काम करणाऱ्यांवर अजूनही टांगती तलवार आहे. शासकीय नोकरदार घरखरेदीसाठी पुढे येत असल्याचे दिसून येत आहे.
सुशांत बारापात्रे, खरेदीदार.