योगेश पांडे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्याबाबत मोठमोठे दावे करण्यात येतात. दरवर्षी विद्यापीठात लाखो विद्यार्थ्यांची नोंदणी होते व कॅम्पसमध्ये तर हे प्रमाण हजारोंमध्ये असते. असे असले तरी २०१४ सालापासून एससी, एसटी, ओबीसी तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांपैकी केवळ साडेचारशे जणांनाच स्पर्धा परीक्षांचे ‘कोचिंग’ देण्यात आले. विद्यापीठाला खरोखरच विद्यार्थ्यांमधून भविष्यातील अधिकारी घडावेत असे वाटते की केवळ पेपरवर्कसाठी ‘फार्स’ सुरू आहे, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
एससी/एसटी/ओबीसी (नॉन-क्रिमीलेयर) आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे स्पर्धा परीक्षांच्या ‘कोचिंग’ची सुविधा देण्यात येते. सेवा, राज्य सेवा, बॅंक भरती इत्यादी परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्यात येते. दरवर्षी या प्रवर्गातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतात. परंतु, त्यापैकी फारच कमी विद्यार्थ्यांना ‘कोचिंग’ मिळते. या केंद्राचे कार्यालय नागपूर विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’ परिसरात आहे. २०१४ ते २०२० या कालावधी या केंद्राच्या माध्यमातून ४५२ विद्यार्थ्यांना ‘कोचिंग’ देण्यात आले. त्यातील केवळ २४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले. हे प्रमाण ५.३१ टक्के इतकेच आहे.
विद्यार्थ्यांपर्यंत माहितीच नाही
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ‘कोचिंग’ योजनेबाबत विद्यापीठाकडून प्रभावी पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत माहितीच पोहोचविली जात नाही. त्यामुळे विद्यार्थीदेखील याचा फायदा घेण्यासाठी समोर येत नाहीत. केवळ नावापुरतीच ही योजना राबवायची आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.