लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लक्ष्मीनगर झोनमध्ये १३ महिन्याच्या कालावधीत केवळ एकाच नागरिकाने फूटपाथवर कचरा टाकला. ही ओळ ऐकून अ़नेकांना आश्चर्याचा धक्का बसला असेल व झोन खरोखरच किती ‘स्वच्छ’ आहे याचे चित्र डोळ्यासमोर रंगविणे सुरू झाले असेल. मात्र थांबा, ही आहे मनपाच्या कागदोपत्री असलेली आकडेवारी. प्रत्यक्षात जर येथील अ़नेक भागांमध्ये चक्कर टाकली असता रस्ते, मोकळी जागा येथे कचरा दिसून येतो. मात्र कारवाईची ही आकडेवारी पाहून मोठमोठे दावे करणाऱ्या मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बहुतेक हा कचरा व तो टाकणारे नागरिक दिसून येत नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे विचारणा केली होती. नागपूर स्वच्छ राखण्याच्या दृष्टीने होत असलेली कारवाई, कचरा टाकणाऱ्यांवर झालेली कारवाई, आकारण्यात आलेला दंड, उघड्यावर मलमूत्र विसर्जन करणाऱ्यांवर झालेली कारवाई, थुंकण्याबाबत झालेली कारवाई इत्यादींबाबत प्रश्न विचारले होते. लक्ष्मीनगर झोनकडून प्राप्त झालेली माहिती खरोखरच आश्चर्यचकित करणारी आहे. लक्ष्मीनगर झोनमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक असून येथे रहिवासी व व्यापारिक अशा भागांचा समावेश होतो. अनेक भागात कचरा दिसून येतो. सर्रासपणे अनेक जण उघड्यावर कचरा टाकतात. मात्र ११ डिसेंबर २०१७ ते २३ जानेवारी २०१९ या कालावधीत मनपाच्या पथकाला रस्ता, फूटपाथ किंवा मोकळ्या जागेवर कचरा टाकताना केवळ एकच नागरिक आढळला व त्याच्याकडून १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय असे करणारे चार दुकानदार, एक कोचिंग क्लासदेखील आढळून आले व त्यांच्यावर ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. या झोनमध्ये दररोज सकाळी रस्ते व फूटपाथवर वाहने तसेच जनावरे धुतल्या जातात. यामुळे परिसर अस्वच्छ होतो. यासाठी केवळ सात जणांवरच कारवाई झाली.चिकन सेंटर्स, गॅरेजेस किती ‘स्वच्छताफ्रेंडली’लक्ष्मीनगर झोनमध्ये अनेक ठिकाणी चिकन सेंटर, मटन विक्रेते तसेच गॅरेजेस आहेत. यांच्या आजूबाजूला नेहमी कचरा दिसून येतो. मात्र मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तोदेखील दिसत नाही. म्हणूनच की काय १३ महिन्याच्या कालावधीत अवघ्या सहा गॅरेजेसवर कारवाई झाली. एकाही चिकन सेंटरवर यासंदर्भात कारवाई झाली नसल्याचे चित्र आहे.
विनापरवानगी बॅनर्सला अभयझोनमध्ये विनापरवानगी अनेक ठिकाणी जाहिरातींचे फलक, बॅनर, होर्डिंग लागले आहेत. अनेक ठिकाणी तर खांब, दुभाजक, वृक्ष इत्यादी ठिकाणी बॅनर लावलेले दिसून येतात. मात्र मनपाला हेदेखील दिसले नाही. असा पद्धतीचा नियमभंग करणारे केवळ १० जण सापडले व त्यांच्यावरच कारवाई झाली.
१२७ जणच थुंकले हो !लक्ष्मीनगर झोनअंतर्गत अवघ्या पाच मिनिटांसाठीदेखील एखाद्या वाहतूक सिग्नलवर कुणी उभे राहून निरीक्षण केले तर दोन डझनांहून अधिक थुंकीबहाद्दर दिसून येतील. मात्र मनपाने याकडेदेखील सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. १३ महिन्यांत सार्वजनिक जागी, रस्ता, फूटपाथवर थुंकणाऱ्या अवघ्या १२७ नागरिकांवर कारवाई झाली व त्यांच्याकडून ११ हजार २०० रुपयांचा दंड वसूल झाला.