नागपूर : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीपुढे बंडखोरांचे टेन्शन पुढे ठाकले आहे. उमेदवारी वाटपात काँग्रेसने १०, राष्ट्रवादीने ५ अशी वाटाघाटी केली. पण राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी काँग्रेस बरोबरच राष्ट्रवादीच्या उमेदवाराचेही टेन्शन वाढविले आहे. ही बंडखोरी शमविण्यात नेत्यांनाही अपयश आले आहे.
रामटेक तालुक्यातील बोथिया पालोरा या सर्कलमध्ये काँग्रेसचे उमेदवार कैलास राऊत यांचे सदस्यत्व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रद्द करण्यात आले होते. पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी त्यांनाच दिली. पण राष्ट्रवादीतर्फे नकुल बरबटे हे तेथून पक्षातर्फे निवडणूक रिंगणात आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत ही जागा काँग्रेससाठी सोडण्यात आली होती. पण राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्त्याला थांबवू शकले नाही. कुही तालुक्यातील राजोला जिल्हा परिषद सर्कलची उमेदवारी काँग्रेसला गेल्याने राष्ट्रवादीचे भागेश्वर फेंडर नाराज झाले. त्यांनी पक्षाचे आदेश मान्य न करता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. येनवामध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नीलेशकुमार धोटे यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवीत आघाडीचे उमेदवार समीर उमप यांच्याविरोधात दंड थोपटले. नरखेड तालुक्यातील सावरगाव सर्कलमधून राष्ट्रवादीच्या उमेदवार देवका बोडखे यांना अधिकृत उमेदवारी दिली. पण येथे माजी आमदार सुनील शिंदे यांची सून अंजली सतीश शिंदे व राष्ट्रवादीचेच समर्थक माजी सरपंच मनीष फुके यांच्या पत्नी उषा मनीष फुके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून, पक्षासमोर आव्हान उभे केले. गुमथळा सर्कलमध्ये काँग्रेसचे अनंता वाघ यांनी दिनेश ढोले यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे.
- बोथिया पालोरा सर्कलची जागा काँग्रेसला गेली होती. पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले होते. आम्ही त्यांना शांत करण्यासाठी बी फॉर्म दिला. त्यानंतर निवडणुका पुढे ढकलण्यात आला. आता मात्र तिथे वातावरण तयार झाले आहे. इतर दोन ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी वैयक्तिक पक्षाचा आदेश पाळत आहे. बंडखोरी व्हायला नको म्हणून विनंती केली आहे. २७ सप्टेंबरपर्यंत वेळ आहे. बघू काय होते तर.
बाबा गुजर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
-
0-0–0