लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीदेखील जवळपास सर्वच पक्षांतील नाराजांनी बंडखोरी केली. दावेदारी असूनदेखील तिकीट न मिळाल्याने आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात अनेकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. पक्षनेत्यांवर बंडखोरांना शांत करण्याची जबाबदारी येत्या तीन दिवसात पार पाडावी लागणार आहे. आता या बंडखोरांची मनधरणी होते की ते रिगणात कायम राहतात हे ७ आॅक्टोबर रोजीच स्पष्ट होऊ शकणार आहे.दक्षिण नागपुरात बंडखोरी सर्वात जास्त प्रमाणात बघायला मिळाली. भाजपचे माजी उपमहापौर सतीश होले यांनी गुरुवारी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. तर शुक्रवारी शिवसेना नगरसेवक किशोर कुमेरिया यांनीदेखील बंडखोरी करत अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक राजू नागुलवार व प्रदेश सचिव योगेश कुंभलकर यांनीदेखील अर्ज भरला. कॉंग्रेसचे प्रमोद मानमोडे यांनीदेखील अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.भाजपाशी जुळलेले मनोज सिंह यांनी पश्चिम नागपुरातून नामांकन अर्ज दाखल केला. उत्तर नागपुरात नगरसेवक मनोज सांगोळे यांनी कॉंग्रेसमधून बंडखोरी करत अर्ज दाखल केला. सांगोळे हे चार वेळा नगरसेवक म्हणू न विजयी झाले आहेत. याच मतदारसंघात बसपाकडून प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी अर्ज भरला असतानादेखील बसपाचे नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार व बुद्धम राऊत यांनी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दुनेश्वर पेठे यांनी नाराजीतून पूर्व नागपुरातून अपक्ष म्हणून आव्हान दिले आहे तर मनपातील एकमेव अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनीदेखील याच मतदारसंघातून अर्ज भरला आहे. मध्य नागपुरातून कॉंग्रेस नगरसेवक रमेश पुणेकर हेदेखील मैदानात आले आहेत. आता या बंडखोरांना शांत करण्यासाठी प्रत्येकच पक्षाला कसरत करावी लागणार आहे.रामटेक मतदार संघात राज्य खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष अॅड.आशिष जैयस्वाल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत भाजप-सेना युतीला धक्का दिला. रामटेकची जागा युतीत सेनेला सुटावी यासाठी जयस्वाल आग्रही होते. मात्र युतीत ही जागा भाजपच्या कोट्यात गेल्याने जयस्वाल यांनी बंडाची भूमिका स्वीकारली आहे.सावनेरमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन राठी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत बंडाचा झेंडा रोवला. राठी येथे भाजपच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. कामठीत भाजपच्या उमेदवारीवरून पोलिटिकल ड्रामा घडला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कंभाले यांनी अपक्ष अर्ज दाखल करीत आव्हान उभे केले आहे. उमरेडमध्ये शिवसेनेचे देवीदास मन्साराम धारगावे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला.
Maharashtra Election 2019; उपराजधानीत बंडोबांनी थोपटले दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 11:04 AM
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीदेखील जवळपास सर्वच पक्षांतील नाराजांनी बंडखोरी केली. दावेदारी असूनदेखील तिकीट न मिळाल्याने आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात अनेकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले.
ठळक मुद्देजयस्वाल, पेठे, राठी, कंभाले, पांडे, सिंह यांचे अर्ज दाखल अधिकृत उमेदवारांचे वाढले टेन्शन