कालिकतमध्ये १२० दिवसांत रिकार्पेटिंग, नागपूरमध्ये कासवगतीनेच होतेय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 02:42 PM2024-12-11T14:42:40+5:302024-12-11T14:43:41+5:30

Nagpur : हायकोर्टाने विमानतळ प्राधिकरण, मिहान इंडियाला मागितले ७ जानेवारीपर्यंत उत्तर

Recarpeting in Calicut in 120 days, in Nagpur the work is going on at a snail's pace | कालिकतमध्ये १२० दिवसांत रिकार्पेटिंग, नागपूरमध्ये कासवगतीनेच होतेय काम

Recarpeting in Calicut in 120 days, in Nagpur the work is going on at a snail's pace

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर :
केरळमधील कालिकत विमानतळातील धावपट्टीचे १२० दिवसांत रिकार्पेटिंग करण्यात आले आहे; परंतु नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळातील धावपट्टीच्या 'रिकापेंटिंग'चे काम कासव गतीने होत आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी भारतीय विमानतळ प्राधिकरण व मिहान इंडिया कंपनीसह इतर संबंधित प्रतिवादींना यावर येत्या ७ जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. 


प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, प्रकरणातील न्यायालय मित्र अॅड. कार्तिक शुकुल यांनी भारतीय  विमानतळ प्राधिकरणचा एक अहवाल सादर करून कालिकतमधील विमान धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचे काम १२० दिवसांत पूर्ण झाल्याची माहिती दिली, तसेच नागपुरातील विमान धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचे कामही याच गतीने पूर्ण केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. परिणामी, न्यायालयाने हे निर्देश दिले. मिहान इंडियाने या प्रकरणात आधीही एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामध्ये कंपनीने विमान धावपट्टीचे आवश्यक तेव्हा 'रिकार्पेटिंग' करणे आणि 'रिकार्पेटिंग'साठी धावपट्टी बंद ठेवणे ही विमानतळ प्रशासनाच्या अधिकार क्षेत्रातील बाब आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या कामात उच्च न्यायालयासह इतर कोणतेही न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, अशी भूमिका मांडली आहे.


'लोकमत'च्या बातमीची दखल 
देशाच्या हृदयस्थळी असलेल्या नागपूर विमानतळाच्या धावपट्टीचे रिकार्पेटिंग रखडले आहे. त्यामुळे विमान वाहतूक प्रभावित झाली आहे. प्रवाशांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे, अशी बातमी 'लोकमत'ने प्रकाशित केली होती. उच्च न्यायालयाने त्या बातमीची नोंद घेऊन यासंदर्भात स्वतःच जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.

'जीएमआर'ला प्रतिवादी करण्याची परवानगी
अॅड. शुकुल यांनी या प्रकरणामध्ये जीएमआर एअरपोर्ट कंपनीला प्रतिवादी करण्यासाठी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला, तसेच या कंपनीला नोटीस बजावून वाचिकेतील मुद्यांवर भूमिका मांडण्याचा आदेश दिला. नागपूर विमानतळाला जागतिक दर्जाचे स्वरूप देण्याकरिता जीएमआर कंपनीला कंत्राट वाटप करण्यात आले आहे. मिहान इंडियाचा जीएमआर'ला प्रतिवादी करण्यास विरोध होता; पण त्यांचे मुद्दे न्यायालयाला प्रभावित करू शकले नाहीत.


सूक्ष्म नियोजनामुळे विक्रमी कामगिरी

  • भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पथकाने सूक्ष्म नियोजन केल्यामुळे कालिकतमध्ये ही विक्रर्मी कामगिरी घडू शकली, सामान्यतः अडीच किलोमीटरपेक्षा जास्त लांब असलेल्या धावपट्टीचे रिकार्पेटिंग करण्यासाठी आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लागतो. 
  • परंतु, कालिकतमध्ये २७ जानेवारी २०२३ रोजी काम सुरू करून २ जून रोजी लक्ष्य पूर्ण करण्यात आले. या कामासाठी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विमान वाहतूक बंद ठेवली जात होती. या वेळेतील सर्व विमानांकरिता रात्रीचे वेळापत्रक तयार करण्यात आले होते.
  • रात्रीच्या विमान वाहतु‌कीकरिता धावपट्टी सज्ज ठेवली जात होती. कालिकत येथे रोज ७० ते ८० विमानांचे आगमन प्रस्थान होते. त्यांपैकी केवळ १० विमाने दिवसाची आहेत.


 

Web Title: Recarpeting in Calicut in 120 days, in Nagpur the work is going on at a snail's pace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.