नागपूर : वाहनचालकांकडून वाहनांचा वाढता वेग बहुतांश वेळा संबंधित वाहन चालकांच्याच जीवावर बेतल्याचे आपण बघतो. स्वत:च्या बेमुर्वतपणामुळे स्वत:चा जीव जाण्यासोबतच अनेक निरपराध लोकांचाही बळी जात असल्याचेही वारंवार दिसून येते.
नागपूर ट्रॅफिक पोलीसांकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार नागपूर शहरात वर्षभरात २४३ रस्ते अपघातांत निरपराध ६३ पादचारी अर्थात फुटपाथवरून किंवा रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्यांचा जीव गेला आहे तर ५ नागरिक गंभीररित्या जखमी झाले आहेत.
वाहनांना दिली पायदळ चालणाऱ्यांना जबर धडक (वर्ष २०२१)
जानेवारी - २०
फेब्रुवारी - २३
मार्च - १९
एप्रिल - १६
मे - १८
जून - २२
जुलै - २५
ऑगस्ट - २५
सप्टेंबर - १७
ऑक्टोबर - २०
नोव्हेंबर - २०
२४ डिसेंबरपर्यंत - १८
एकूण - २४३ अपघात
ऑक्टोबरपर्यंत ७६७ रस्ते अपघात
२०२१ मध्ये १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर दरम्यान नागपूर शहरात ७६७ रस्ते अपघातांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत याच दरम्यान अपघातांची ही संख्या १६९ अपघातांनी जास्त आहे. यात २४३ अपघातांत पादचारी भरडले गेले आणि त्यात ६३ मृत्यू तर ५ गंभीर जखमी झाले. २०२० मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान ५९८ रस्ते अपघातांची नोंद झाली होती. यात २२४ पादचाऱ्यांच्या मृत्यूची नोंद राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
लॉकडाऊन उठताच अपघातांत वाढ
२०२० मध्ये मार्च महिन्यात लॉकडाऊन लागल्यापासून पुढचे चार-पाच महिने रस्त्यांवर वर्दळ नव्हती. या काळात रस्ते अपघातांची संख्या नगण्य अशीच होती. लॉकडाऊन उठताच रस्त्यांवर वाढलेल्या वर्दळीने अपघातांच्या संख्येत वाढ झाली. २०२१ मध्येही होळीपासून पुढचे काही महिने लॉकडाऊन होते आणि लॉकडाऊन उठल्यानंतर अपघातांच्या संख्येत पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येते.
फुटपाथ केवळ नावालाच
शहरात रस्ते विकासाचे कार्य झपाट्याने सुरू आहे. प्रत्येक रस्त्यांवर फुटपाथ असणे हा अघोषित नियमच आहे. मात्र, जिथे कुठे फुटपाथ आहे तिथे रस्त्याशेजारील दुकानदार अतिक्रमण करतो. शिवाय, मोठ्या रस्त्यांवरील फुटपाथवरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले दिसून येते. अशा स्थितीत पादचाऱ्यांना फुटपाथ ऐवजी रस्त्याच्या कडेने चालावे लागते. ही बाब महाल, सीताबर्डी, सक्करदरा, गोकुळपेठ, धरमपेठ, मनीषनगर, खामला आदी सर्वत्र दिसून येते.