लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतील विषय समित्यांना संवैधानिक अधिकार नाही. असे असतानाही काही विषय समित्यांचे सभापती विकास कामांना मंजुरी नसतानाही आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना कामे मिळावीत यासाठी शिफारस पत्र देताहेत. स्थायी समितीकडे प्रस्ताव न पाठविता परस्पर पत्रव्यवहार सुरू असल्याने सत्तापक्षातील अंतर्गत कलह पुढे आला आहे.
विषय समित्यांनी प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविणे आवश्यक आहे; परंतु प्रस्तावाला मंजुरी मिळण्यापूर्वीच काही सभापती कंत्राटदारांना पत्र देत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. मनपात असा प्रकार यापूर्वी घडला नसून यामागे अर्थकारण असल्याची चर्चा असल्याने सत्तापक्षाची चांगलीच कोंडी झाली आहे.
मनपा अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर दीड महिन्याने स्थायी समिती कार्यालयात वर्दळ वाढली आहे. नगरसेवक फाईल घेऊन स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांचा शोध घेत भटकंती करीत असल्याचे चित्र आहे. भेट झाली तरी संबंधित शीर्षकात निधी नसल्याचे सांगून नगरसेवकांना परत पाठविले जात आहे. दुसरीकडे भाजपचे डझनभर नगरसेवक व काँग्रेसचे दोन-तीन नगरसेवक वगळले, तर अन्य नगरसेवकांना कोणीही वाली नाही. स्थायी समितीत चेहरा बघून फाईल मंजूर करण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे सत्ता पक्षातील नवीन नगरसेवकांना निराश होऊन परतावे लागत आहे.
स्थायी समिती कक्षातून बाहेर पडताच नाराजी व्यक्त केली. चेहरा बघून काम करण्याची प्रवृत्ती वाढल्याचा आरोप केला. झोन बजेटमध्ये मंजूर असलेली फिक्स प्रायोरिटीची कामे होत नाही. वास्तविक राज्य सरकारकडून दर महिन्याला १०८ कोटी जीएसटी, मालत्ता, नगर रचना, बाजार विभागाचे उत्पन्न वाढले आहे. दोन वर्षांत शहरात कोणतीही नवीन कामे झालेली नाही. याचा विचार करता निधीची कमतरता नाही. दोन वर्षांत कामे न होणे हे सत्ता पक्षाचे अपयश आहे. काही पदाधिकारी स्वत: कामे करण्यात व्यस्त असून, त्यांना शहरातील नागरिकांची चिंता दिसत नाही.
चिंचभुवन घाटासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली होती, तर रस्त्यासाठी दोन वर्षांपासून निधी मागत; परंतु निधी नसल्याचे कारण पुढे केले जात असल्याचे एका नगरसेवकाने सांगितले. सत्ता पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे शहरातील विकास थांबल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष नेत्यांना सत्ताधारी जुमानत नसल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला. यासंदर्भात स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु ते कार्यालयात नव्हते. फोनवर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
....
आयुक्तांशी चर्चा केली - वनवे
रखडलेल्या विकास कामांच्या फाईलला तातडीने मंजुरी द्यावी यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी चर्चा केली. लवकरच कामांना मंजुरी मिळेल. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या फाईल मंजूर होण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी दिली.