नागपूर : मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायमूर्ती पदी नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केंद्र सरकारला केली आहे.
सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वात कॉलेजियमची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. न्यायमूर्ती वराळे यांनी कायद्याची पदवी मिळविल्यानंतर ऑगस्ट-1985 पासून ऍड. एस. एन. लोया यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली. दरम्यान, त्यांनी औरंगाबाद येथील आंबेडकर विधी महाविद्यालयात 1990 ते 1992 पर्यंत प्राध्यापक म्हणूनही कार्य केले. तसेच ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सहाय्यक सरकारी वकील म्हणून देखील काही काळ कार्यरत होते. त्यानंतर 18 जुलै 2008 रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती पदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून ते या न्यायालयात कार्यरत आहेत.