लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याच्या विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आर. एन. लड्ढा (यवतमाळ), नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश संजय मेहरे (अकोला), हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या अध्यक्ष अॅड. गौरी वेंकटरमन, अॅड. मकरंद अग्निहोत्री, अॅड. अभय सांबरे आणि अॅड. रणजित भुईभार (नागपूर) या विदर्भातील विधिज्ञांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची सर्वोच्च न्यायालयाला शिफारस करण्यात आली आहे.मुंबई उच्च न्यायालयाने न्यायमूर्तीपदी नियुक्तीसाठी राज्यातील २२ विधिज्ञांची यादी सर्वोच्च न्यायालयाला पाठवली आहे. त्यात विदर्भातील सहा विधिज्ञांचा समावेश आहे. आता ही नावे सर्वोच्च न्यायालयातील तीन वरिष्ठ न्यायमूर्तींचा समावेश असलेल्या कॉलेजियमपुढे ठेवल्या जातील. त्यानंतर कॉलेजियम विविध पैलूंचा विचार करून योग्य त्या विधिज्ञांची न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यासाठी केंद्रीय विधी व न्याय विभागाला शिफारस करेल.पुढे केंद्र सरकारने मंजुरी प्रदान केलेल्या विधिज्ञांच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीचे राष्ट्रपतींद्वारे वॉरंट जारी केले जातील. मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्तींची ९४ (७१-कायम, २३-अतिरिक्त) पदे मंजूर आहेत. सध्या ६९ (५०-कायम, १९-अतिरिक्त) न्यायमूर्ती कार्यरत असून २५ (२१-कायम, ४-अतिरिक्त) पदे रिक्त आहेत.
विदर्भातील सहा विधिज्ञांची न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 10:27 AM
मुंबई उच्च न्यायालयाने न्यायमूर्तीपदी नियुक्तीसाठी राज्यातील २२ विधिज्ञांची यादी सर्वोच्च न्यायालयाला पाठवली आहे. त्यात विदर्भातील सहा विधिज्ञांचा समावेश आहे.
ठळक मुद्दे सर्वोच्च न्यायालयाला पाठवली यादी