लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरमध्ये कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आणि लॉकडाऊनच्या अंमलबजावणीकरिता वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशांच्या प्रती व अन्य दस्तावेज रेकॉर्डवर सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित याचिकाकर्ते व प्रतिवादींना दिले आहेत. याकरिता त्यांना मंगळवारपर्यंत वेळ देण्यात आला आहे.महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोना संक्रमण रोखण्याच्या उद्देशाने ३ व ४ मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनांच्या वैधतेला अॅड. प्रकाश जयस्वाल, अॅड. कमल सतुजा, अॅड. मनोज साबळे व अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मनपा आयुक्तांनी वादग्रस्त अधिसूचनांद्वारे लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक वस्तूंसह अन्य काही दुकाने सुरू करण्याची मुभा दिली आहे. त्यात खासगी कार्यालये आणि दारुसह अन्य अनेक प्रकारच्या दुकानांचा समावेश नव्हता. त्यानंतर ही याचिका प्रलंबित असताना मनपा आयुक्तांनी आणखी काही नवीन आदेश जारी केले. परिणामी, न्यायालयाने वरील निर्देश दिले.