अकरावी प्रवेश प्रक्रिया : अखेरच्या दिवशी १५ हजार अर्जनागपूर : केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या अकरावीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज दाखल करण्याची मंगळवारी अखेरची संधी होती. शेवटच्या दिवशी थोडेथोडके नव्हे तर तब्बल १५ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आल्याची माहिती समितीतर्फे देण्यात आली आहे. अर्ज भरल्यानंतर आता विद्यार्थ्यांमध्ये प्रवेश यादीसंदर्भात उत्सुकता दिसून येत आहे.दहावीचा निकाल जाहीर होण्याच्या दिवशीच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. यंदाची प्रवेश प्रक्रिया विज्ञान व द्विलक्षी शाखांसोबतच कला व वाणिज्यसाठी आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शहरातील निरनिराळ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्ज घेण्यासाठी व दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज सादर करण्यात आले. कला, वाणिज्य, विज्ञान व द्विलक्षी मिळून १५ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. यात विज्ञान शाखेसाठी (इंग्रजी) सर्वाधिक १२,६३८ अर्ज आले तर द्विलक्षी शाखेच्या अर्जांची संख्या १,९५० इतकी होती. एकूण किती अर्ज दाखल झाले याची निश्चित माहिती उपलब्ध होऊ शकली नसली तरी, हा आकडा ९० हजारांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.यानंतर प्रवेश अर्जांची पडताळणी करण्यात येईल व जुलैच्या पहिल्या आठवड्यातच प्रवेश यादी जाहीर करण्यात येईल.(प्रतिनिधी)
अकरावी प्रवेशासाठी रेकॉर्ड अर्ज
By admin | Published: June 25, 2014 1:16 AM